हिंदुस्थानी लष्कराच्या बॅटल एक्स डिव्हिजनच्या युनिट्सनी या आधुनिक डॉगद्वारे शत्रूचा शोध घेऊन त्यांचा खात्मा करण्याचा सराव यशस्वीपणे पूर्ण केला आहे. उंचावरील भागात मदत आणि वाहतूक सुधारण्यासाठी लॉजिस्टिक ड्रोनची चाचणी केली जात आहे. यासाठी 100 रोबोटिक डॉग समाविष्ट केले आहेत.
लष्कराची पॉवर वाढली
या डॉगला 1 मीटर ते 10 किमीपर्यंत दूर राहून ऑपरेट करता येते. हे वायफायवरूनही ऑपरेट करता येऊ शकते. यात एक कॅमेरा बसवण्यात आला असून तो 360 डिग्रीपर्यंत फिरवता येऊ शकतो. रोबोटिक डॉग सेन्सरद्वारे काम करतात. त्यांच्याकडे रिमोट कंट्रोल युनिट आहे. हे रोबोटिक डॉग लष्कराला आवश्यक वस्तू पुरवतील.
जगभरात वेगवेगळ्या क्षेत्रात टेक्नोलॉजीचा अत्यंत खुबीने वापर केला जात आहे. हिंदुस्थानी लष्करात दाखल करण्यात आलेले ’रोबोटिक डॉग’ आता सज्ज झाले असून शत्रूचे तळ नष्ट करण्यासाठी, गोळीबार करण्यापासून ते शत्रूंच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यापर्यंत ते रणांगणात आपल्या सैनिकांच्या खांद्याला खांदा लावून सक्रिय असणार आहेत. रोबोटिक डॉगला एक तास चार्ज केल्यानंतर 10 तास काम करण्याची क्षमता त्यात असणार आहे.
पर्वत, पाणी किंवा घनदाट जंगल असले तरी या डॉगला काहीही फरक पडणार नाही. ते आपली कामे व्यवस्थित पार पाडतील. राजस्थानच्या जैसलमेरमधील पोखरण फायरिंग रेंज येथे ’रोबोटिक डॉग’ने हिंदुस्थानी लष्कराच्या बॅटल एक्स डिव्हिजनसोबत नुकताच सराव केला आहे. हा सराव 14 ते 21 नोव्हेंबर दरम्यान सुरू होता. यावेळी 50 जवानांनी 10 रोबोटिक डॉगसोबत सराव केला. हा सराव 7 दिवस चालला. या सरावात रोबोटिक डॉगने शत्रूचा शोध घेणे, शस्त्रs बाळगणे, कॅमेऱयांद्वारे शत्रूचे ठिकाण उघड करणे आदी कामांचा सराव करण्यात आला. आधुनिक तंत्रज्ञानाने बनवलेल्या या रिमोट डॉगमुळे लष्कराची पॉवर वाढली आहे.