ठसा – आर. राजेंद्रन

>> दिलीप ठाकूर

चित्रपती व्ही.शांताराम आणि राज कपूर हे आपल्या दिग्दर्शनातील चित्रपटाचे स्वतःच संकलक असत. चित्रपट माध्यमात पटकथा व संकलन या दोन अतिशय महत्त्वाच्या गोष्टी आहेत असे त्यांचे म्हणणे होते, पण सगळ्याच दिग्दर्शकांना संकलक होता येणे शक्य नसते आणि सगळेच संकलक दिग्दर्शनातही पाऊल टाकतील असेही नाही. अनेकांनी मात्र भिन्न कार्यशैलीतील दिग्दर्शनातील चित्रपटांचे संकलन करीत आपल्या कर्तृत्वाचा उत्तम ठसा उमटवला.

असेच एक चित्रपट संकलक आर. राजेंद्रन यांचे 15 नोव्हेंबर 2024 रोजी तामीळनाडूतील मधुराई येथे निधन झाले. आर. राजेंद्रन हे खरं तर तामीळ भाषिक आणि त्या भाषेतील अनेक चित्रपटांचे संकलन करतानाच हिंदी भाषेतील चित्रपटांचेही संकलन त्यांनी केले हे विशेष उल्लेखनीय. खरं तर हिंदी भाषा त्यांना फारशी अवगत नव्हती, पण त्याचा त्यांच्या कामात कोणताही अडसर आला नाही. त्यापेक्षा त्यांनी दिग्दर्शकाशी चर्चा, थीमची माहिती, पटकथेची मांडणी व दृश्य माध्यमाची वैशिष्टय़ यांना जास्त महत्त्व दिले. त्यातही विशेष म्हणजे भिन्न शैलीतील दिग्दर्शकांच्या चित्रपटांचे त्यांनी संकलन केले. मुकुल आनंद दिग्दर्शित ‘खुदा गवाह’, अनिल शर्मा दिग्दर्शित ‘फरिश्ते’, लॉरेन्स डिसोझा दिग्दर्शित ‘साजन’, पार्थो घोष दिग्दर्शित ‘युगपुरुष’ ही उदाहरणे यासाठी पुरेशी आहेत. हे नव्वदच्या दशकातील पारंपरिक मसालेदार मनोरंजक चित्रपटांचे दिग्दर्शक. यातही दिग्दर्शक मुकुल आनंद पटकथेपेक्षा तांत्रिक गोष्टींवर जास्त भर देणारा म्हणून जास्त ओळखला जाई. ते कुठेही अडथळा न ठरता संकलन करण्याचे कसब आर. राजेंद्रन यांना साध्य झाले होते. या चित्रपटाचे मुंबईतील वांदय़ातील मेहबूब स्टुडिओत भल्यामोठय़ा सेटवर बरेचसे चित्रीकरण झाले तसेच अफगाणिस्तानातील वाळवंटी भागातही बरीच ऍक्शन दृश्ये चित्रीत झाली. या चित्रपटात अमिताभ बच्चन, दुहेरी भूमिकेतील श्रीदेवी, नागार्जुन, शिल्पा शिरोडकर, डॅनी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. अफगाणिस्तानातील काबूल व मझर-इ-शरीफ ही शहरे, नेपाळमधील अनेक जागा अशा अनेक ठिकाणी ‘खुदा गवाह’चे चित्रीकरण झाले आणि जेव्हा अतिशय मोठय़ाच प्रमाणावर वा अवाजवी चित्रीकरण होते तेव्हा त्यावर मोठय़ाच प्रमाणावर कात्री चालवत चालवत आवश्यक इतकेच चित्रीकरण उपयोगात आणून चित्रपटाला आकार द्यायचा असतो. या सगळ्यात संकलकाचे प्रचंड कसब, कसरत आणि कौशल्य असते. आर. राजेंद्रन यात यशस्वी ठरले. या चित्रपटाचे निर्माते मनोज देसाई यांनीही या चित्रपटाच्या निर्मितीवर भरपूर पैसे खर्च करायची तयारी ठेवली आणि या चित्रपटाच्या तांत्रिक विभागाला भरपूर स्वातंत्र्यही दिले. या चित्रपटाचे कला दिग्दर्शक सुरेश सावंत व संकलक आर. राजेंद्रन यांनी हा चित्रपट अधिकच वेधक बनवला. या चित्रपटाच्या संकलन कौशल्यामुळे आर. राजेंद्रन अधिकच नावारूपास आले.

त्यांनी संकलन केलेल्या हिंदी व तामीळ चित्रपटांची संख्या जवळपास अडीचशे इतकी आहे. तब्बल साडेतीन दशके ते कार्यरत होते. या काळात चित्रपट संकलनाची पद्धत बदलली. कॉम्प्युटरवर ते केले जाऊ लागले. त्याला ऍव्हिड म्हणतात. आर. राजेंद्रन यांनी हे नवीन तंत्रही आत्मसात केले.
आर. राजेंद्रन यांनी संकलन केलेल्या तामीळ भाषेतील चित्रपटात ‘पॅराडाईज’, ‘फाईंडर’, ‘रत्नम’ या तर हिंदी चित्रपटांत ‘पनाह’, ‘बेदर्दी’, ‘हंड्रेड डेज’, ‘राधा का संगम’, ‘आरजू’ इत्यादी अनेक चित्रपटांचा समावेश होतो.

दृश्य माध्यम व चित्रपट दिग्दर्शनाची उत्तम समज असलेले संकलक म्हणून आर. राजेंद्रन ओळखले गेले.