ICBM स्ट्राईकवर गप्प राहायचं…! भर पत्रकार परिषदेत रशियन प्रवक्त्याला थेट क्रेमलीनमधून फोन

रशियाने गुरुवारी पहाटे आयसीबीएम क्षेपणास्त्रांनी युक्रेनवर हल्ला केल्याची घटना घडली. मात्र रशियाच्या प्रवक्त्याने आयसीबीएम क्षेपणास्त्रांनी केलेल्या हल्ल्याबाबत काहीही बोलण्यास नकार दिला आहे. रशियाने या हल्ल्यानंतर पत्रकार परिषद घेतली. रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या मारिया जखारोवा या पत्रकार परिषदेला संबोधित करत होत्या.

मारिया जखारोवा पत्रकार परिषदेला संबोधित करत असतानाच त्यांना अचानक क्रेमलिनमधून फोन आला आणि त्यांनी आयसीबीएम क्षेपणास्त्र हल्ल्यावर काहीही बोलण्यास नकार दिला. त्यांना आयसीबीएम हल्ल्याबाबत मौन बाळगण्यास सांगण्यात आलं. क्रेमलिनमधून जेव्हा त्यांना फोन आला तेव्हा त्या पत्रकारांशी संवाद साधत होत्या. त्याचवेळी फोनवर बोलताना त्या माइक बंद करायला विसरल्या आणि त्यांचा फोनवरील संवाद हा सार्वजनिक झाला.

दरम्यान, 21 नोव्हेंबर रोजी सकाळी 5 ते 7 च्या दरम्यान रशियाने युक्रेनच्या डनिप्रो शहरावर आयसीबीएम क्षेपणास्त्रांनी हल्ला केला. या युद्धात पहिल्यांदाच या क्षेपणास्त्राने हल्ला करण्यात आला. रशियाने यासाठी RS-26 Rubezh क्षेपणास्त्राचा वापर केला असण्याची शक्यता आहे.

युक्रेनच्या हवाई दलाने या हल्ल्याला दुजोरा दिला आहे. या क्षेपणास्त्राशिवाय किंजल हायपरसोनिक आणि KH-101 क्रूझ क्षेपणास्त्रांनीही हल्ला करण्यात आला. युक्रेनियन हवाई दलाने सांगितलं आहे की, त्यांच्या महत्त्वाच्या संस्था आणि इमारतींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या हल्ल्यात अण्वस्त्रांचा वापर करण्यात आला आहे. रशियाने क्रूझ क्षेपणास्त्रे डागण्यासाठी आपल्या लांब पल्ल्याच्या बॉम्बर Tu-95MS चा वापर केला आहे. या बॉम्बरने व्होल्गोग्राड भागातून उड्डाण केले. तर किंजल हायपरसॉनिक क्षेपणास्त्रे तांबोव भागातून उडवलेल्या मिग-31के फायटर जेटमधून डागण्यात आली.

याचदरम्यान, रशियाने दावा केला आहे की, त्यांच्या हवाई संरक्षण यंत्रणेने दोन ब्रिटीश स्टॉर्म शॅडो क्षेपणास्त्रे पाडली आहेत. ही क्षेपणास्त्रे युक्रेनने रशियाच्या दिशेने डागली होती. युक्रेनने आधी रशियाविरुद्ध या क्षेपणास्त्राचा वापर केला.