मणिपूरमधील वाढत्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार राज्यात सतत अतिरिक्त सुरक्षा दल तैनात करत आहे. याच पार्श्वभूमीवर बुधवारी केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या (CAPF) आठ कंपन्या राज्याची राजधानी इंफाळमध्ये दाखल झाल्या आहेत. संवेदनशील आणि सीमावर्ती भागात हे दल तैनात करण्यात येणार आहे.
राज्यातील संवेदनशील आणि सीमावर्ती भागात सीआरपीएफ आणि बीएसएफच्या प्रत्येकी चार कंपन्या तैनात केल्या जातील, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. सीआरपीएफची यापैकी एक कंपनी महिला बटालियनची आहे.
गेल्या आठवड्यात जिरीबाम या डोंगरी जिल्ह्यात काँग्रेस आणि भाजपच्या कार्यालयांची तोडफोड झाल्याने राज्यात हिंसाचार वाढला आहे. इंफाळ खोऱ्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये जमावाने तीन भाजप आमदार आणि काँग्रेसच्या एका आमदाराच्या घरांना आग लावल्यानंतर तोडफोडीच्या घटना घडल्या. यानंतर येथे अनिश्चित काळासाठी कर्फ्यू लागू करण्यात आला आहे.
तणावाच्या पार्श्वभूमीवर खोऱ्यातील पाच जिल्ह्यांतील शाळा आणि महाविद्यालये 16 नोव्हेंबर रोजी बंद करण्यात आली होती. आता इंफाळ पश्चिम आणि इंफाळ पूर्वेतील शाळा आणि महाविद्यालये 23 नोव्हेंबरपर्यंत बंद राहतील.