भयंकर! निवडणूक अधिकाऱ्याचाच व्होट जिहाद; कर्जतमध्ये थोरवेंना मतदान करण्यासाठी वृद्धांवर दबाव

आता चक्क सत्ताधाऱ्यांसाठी निवडणूक अधिकारीच व्होट जिहादची मोहीम चालवत असल्याचा भयंकर प्रकार आज कर्जतमध्ये समोर आला आहे. मतदान केंद्रांवर येणाऱ्या वृद्धांना खुलेआम एक नंबरचे बटण दाबून थोरवेंना मतदान करण्यासाठी अधिकारीच दबाव टाकत होते. रोशन रुठे नावाच्या जागरूक मतदाराने हा आरोप केला. अधिकाऱ्यांच्या या मिंधेगिरीचा भंडाफोड होताच संतप्त गावकऱ्यांनी प्रशासनाला जाब विचारला. त्यामुळे हादरलेल्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी तत्काळ दोषी अधिकाऱ्याची उचलबांगडी करत प्रकरणावर पांघरुण टाकण्याचा प्रयत्न केला, परंतु निवडणूक अधिकाऱ्यांच्या या कारनाम्याने काही काळ या केंद्रावर चांगलाच गोंधळ उडाला होता.

गावकऱ्यांच्या रुद्रावतारानंतर ‘मिंधे’ अधिकाऱ्याची उचलबांगडी

विधानसभा निवडणुकीत पराभव होईल अशी धास्ती भाजप मिंध्यांना आहे. त्यामुळे हरप्रकारे ही निवडणूक जिंकण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यातूनच मंगळवारी विरारमध्ये भाजपचे नोटकांड पुढे आले असून पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांना पैसे वाटताना बविआच्या कार्यकत्यांनी रंगेहाथ पकडले होते. आता थेट निवडणूक अधिकारीच सत्ताधाऱ्यांचा उमेदवार विजयी होण्यासाठी त्याला मतदान करा, असे सांगत असल्याचा प्रकार कर्जतच्या बीड मतदान केंद्रावर समोर आला आहे. रोशन रुठे हे आजोबांसह मतदानासाठी बीड केंद्रावर गेले होते. त्यावेळी तेथील मतदान अधिकाऱ्यांनी या आजोबांना एक नंबरचे बटण दाबा असे सांगितल्याचे रोशन याने ऐकले. त्याअगोदरदेखील मतदानासाठी आलेल्या वृद्ध मतदारांवर अशाच पद्धतीने दबाव टाकल्याचा आरोप रोशन यांनी केला.

माझी गाडी तपासली तेव्हा सगळे ‘क्लिअर’ होते, मग नंतर माझ्या गाडीत पैसे आणि दारू मिळाल्याचा गुन्हा कसा दाखल झाला?

आणि एकच गोंधळ उडाला

ईव्हीएम मशीनवर एक नंबरचे उमेदवार महेंद्र थोरवे आहेत. असे असताना निवडणूक अधिकारी चक्क एक नंबरचे बटण दाबा असा दबाव टाकत असल्याचा आरोप काही मतदारांनी केला आहे. काही जागरूक नागरिकांनी बीड केंद्रावर धडक देत संबंधित अधिकाऱ्याला जाब विचारला. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. यानंतर संबंधित अधिकाऱ्याची उचलबांगडी केली गेली. दरम्यान, निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत सकपाळ यांनी याठिकाणी नवीन अधिकाऱ्याची नेमणूक केल्याची माहिती दिली. मात्र संबंधित अधिकाऱ्यावर नेमकी काय कारवाई करणार याबाबत त्यांनी अधिक माहिती देण्यास टाळाटाळ केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

बीड मतदान केंद्रावरील अधिकारी थोरवेंना मदत व्हावी यासाठी एक नंबरचे बटण दाबा असे सांगताना मी ऐकले. हा प्रकार लोकशाहीला डाग लावणारा असल्याने आम्ही याविरोधात तत्काळ तक्रार केली.

– रोशन रुठे, प्रत्यक्षदर्शी