टीम इंडियासाठी पर्थवर अग्निपथ; पहिल्या कसोटीत हिंदुस्थानी संघाचा संघर्ष अटळ

न्यूझीलंडविरुद्ध व्हाईटवॉश आणि ऑस्ट्रेलियाला 4-0 ने हरवायच्या दडपणामुळे पर्थवरचा पहिला कसोटी सामना हिंदुस्थानी संघासाठी अक्षरशः ‘अग्निपथ’सारखा झाला आहे. त्यामुळे पर्थवर हिंदुस्थानी संघाचा संघर्ष अटळ आहे. परिणामतः ऑस्ट्रेलियन संघाने मालिकेत आघाडी घेण्यासाठी रणनीती आखली आहे.

न्यूझीलंडविरुद्ध रोहित शर्माच्या बॅटमधून धावाही निघाल्या नव्हत्या आणि संघही दारुणरीत्या पराभूत झाला होता. या पराभवामुळे हिंदुस्थानी संघाला दुहेरी धक्का बसला असला तरी न्यूझीलंडला हरवून ऑस्ट्रेलियात ताठ मानेने दाखल होण्याचे ध्येय हिंदुस्थानी संघाचे होते, पण झाले नेमके उलटे. ऑस्ट्रेलियाच्या महादौऱयावर हिंदुस्थान खचलेल्या वृत्तीने दाखल झालाय आणि त्यातच रोहित शर्मा वैयक्तिक कारणास्तव संघासोबत नाही. या दोन्ही गोष्टींचा संघावर विपरीत परिणाम झालाय. त्यातच शुबमन गिलच्या अंगठय़ाला झालेल्या दुखापतीमुळे हिंदुस्थानची आघाडी फळी खिळखिळी झाली. एकाच क्षणात दोन महत्त्वाचे फलंदाज गळल्यामुळे हिंदुस्थानी संघाला अक्षरशः गोळा इलेव्हन करावी लागत आहे. कसोटी सुरू व्हायला 24 तास उरले असतानाही हिंदुस्थान संघ आपला अंतिम संघ जाहीर करू शकलेला नाही.

देवदत्त पडिक्कल हिंदुस्थानी संघात

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी हिंदुस्थानने आधीच 18 सदस्यीय संघ निवडला होता. आता त्या संघात देवदत्त पडिक्कलचाही समावेश करण्यात आला आहे. हिंदुस्थानी ‘अ’ संघातून ऑस्ट्रेलिया ‘अ’ संघाविरुद्ध दोन अनौपचारिक कसोटी सामने खेळण्यासाठी देवदत्त ऑस्ट्रेलिया दौऱयावर आला होता. हिंदुस्थानी संघावर कोसळलेल्या सलामीच्या संकटामुळे हिंदुस्थानी संघव्यवस्थापनाने मंगळवारी त्याला शेवटच्या क्षणी संघात घेण्याचा निर्णय घेतला आहे. एवढेच नव्हे तर तो पर्थवर तिसऱया स्थानावर खेळण्याच्या तयारीत आहे. तो या वर्षी धर्मशाळा येथे इंग्लंडविरुद्ध झालेल्या कसोटीत खेळला होता. शर्मा आणि गिल नसल्यामुळे खबरदारी म्हणून पडिक्कलला संघात निवडण्याचा प्रकार संघव्यवस्थापनाने केला आहे. ऑस्ट्रेलिया ‘अ’ विरुद्ध देवदत्तची कामगिरी संघ व्यवस्थापनाला संघात घेण्याइतपत चांगली वाटली नव्हती, पण आता त्यांनी त्याच्यासाठी पर्थ कसोटीचे द्वार उघडले आहेत.

नितीश रेड्डी पदार्पणासाठी रेडी

पर्थच्या खेळपट्टीवर हिंदुस्थानला चार वेगवान गोलंदाज खेळवावेच लागणार आहेत. कर्णधार जसप्रीत बुमरा, मोहम्मद सिराजसह आकाश दीप या तिघांचे स्थान पक्के होते. त्यामुळे चौथ्या स्थानासाठी हर्षित राणा, प्रसिध कृष्णा आणि नितीश रेड्डी यांच्यात चुरस होती. पण या तिघांत फलंदाजी करणारा नितीश संघव्यवस्थापनाच्या पसंतीस उतरला आहे. तो गोलंदाजीतही एका टप्प्यावर गोलंदाजी टाकण्यात अचूक असल्यामुळे रेड्डीला पदार्पणाची संधी मिळणार असल्याचे संकेत दिले गेले आहे.

सरफराजच्या जागी जुरेल खेळणार

न्यूझीलंडविरुद्धची एकमेव दीडशतकी खेळी वगळता सरफराज खान उर्वरित पाचही डावात अपयशी ठरला होता आणि तरीही तो कसोटी संघात असला तरी पर्थ कसोटीत ध्रुव जुरेलला मधल्या फळीतील फलंदाज म्हणून खेळविण्याचे धाडस केले जाणार आहे. जुरेल हा यष्टिरक्षक असला तरी त्याचा खेळ पाहून ऋषभ पंतसोबत त्यालाही खेळविले जाणार आहे. त्यामुळे पर्थवर एकप्रकारे के. एल. राहुलसह हिंदुस्थानी संघात तीन-तीन स्पेशालिस्ट खेळविण्याची वेळ आलीय. याचाच अर्थ असा की, हिंदुस्थानची आघाडीची फळी अक्षरशः कमकुवत झाल्यामुळे यष्टिरक्षकांना फलंदाजाचे कपडे घालवून खेळविले जाणार आहे.

संभाव्य अंतिम संघ

 हिंदुस्थान ः यशस्वी जैसवाल, लोकेश राहुल,  देवदत्त पडिक्कल, विराट कोहली, ऋषभ पंत, रवींद्र जाडेजा, ध्रुव जुरेल, नितेशकुमार रेड्डी, जसप्रीत बुमरा (कर्णधार), मोहम्मद सिराज, आकाश दीप

 ऑस्ट्रेलिया ः उस्मान ख्वाजा, नॅथन मॅकस्विनी, मार्नस लाबुशेन, स्टीव्ह स्मिथ, ट्रव्हिस हेड, मिचेल मार्श, ऍलेक्स कॅरी, नॅथन लियॉन, पॅट कमिन्स, जोश हेझलवूड, मिचेल स्टार्क.