ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी हिंदुस्थानच्या राखीव खेळाडूंच्या यादीत असलेल्या खलील अहमदला दुखापत झाल्याने त्याच्या जागी यश दयालची संघात निवड करण्यात आली आहे. बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेदरम्यान संघात स्थान देण्यात आलेल्या दयालला नुकत्याच झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मध्ये स्थान देण्यात आले होते. पण त्याला एकाही सामन्यात संधी लाभली नाही. खलीलला सरावादरम्यान दुखापत झाल्यामुळे तो नेटमध्ये गोलंदाजीही करू शकत नव्हता. त्यामुळे त्याला काही दिवस विश्रांती देण्यात आली आहे. हिंदुस्थानी संघाला सरावादरम्यान मिचेल स्टार्कसारखा गोलंदाज हवा, अशी बीसीसीआयची भावना आहे. दयालला ऑस्ट्रेलियात ‘अ’ संघासाठी कसोटी खेळता यावी म्हणून निवडण्यात आले होते. मात्र त्याला दक्षिण आफ्रिकेत धाडले. जर खलील संघाबरोबर राहून गोलंदाजी करू शकत नसेल तर त्याला इथे ठेवण्यात काहीही अर्थ नसल्यामुळे मायदेशात पाठवले जात असल्याचे बीसीसीआयच्या सूत्रांकडून समजले आहे.