बोटाला शाई लावली…वोटिंग बटण दाबले अन् हृदयविकाराने मतदान केंद्रातच मतदाराचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी साताऱयाच्या खंडाळा तालुक्यामधील मोर्वे येथील मतदान केंद्रावर घडली.
श्याम नानासाहेब धायगुडे (67) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. राज्यात लोकशाहीचा महोत्सव सुरू असताना शाम नानासाहेब धायगुडे हे मोर्वे येथील मतदान केंद्रावर आल्यानंतर त्यांनी नावाची चिठ्ठी देऊन ओळखपत्र दाखवून बोटाला शाई लावली. त्यानंतर पुढील प्रक्रिया सुरू केली. वोटिंग बटण दाबले आणि बीप मशीनचा आवाज येण्याच्या अगोदरच त्यांना तीव्र हृदयविकाराचा झटका आला आणि ते जमिनीवर कोसळले.
यावेळी तेथील उपस्थित अधिकारी आणि गावचे पोलीस पाटील यांनी ताबडतोब त्यांना एका खासगी वाहनातून लोणंद येथे उपचारासाठी हलवले, मात्र वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे मोर्वे गावावर शोककळा पसरली आहे. सायंकाळी पाच वाजता धायगुडे यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. गावात ही दुखाची घटना घडली असतानाही गावातील नागरिकांनी या लोकशाहीच्या महोत्सवात सामील होत गावातील नागरिकांनी 71 टक्के मतदान केले. इतक्या दुŠखद घटनेनंतरही धायगुडे कुटुंबीयांनी आपले मतदानाचे कर्तव्य बजावल्याबद्दल त्यांचे कौतुकही होत आहे.