महाराष्ट्रात 65 टक्के मतदान! महागाई, बेरोजगारी आणि अदानीच्या संकटाविरोधात मतदारांचा आसुड

मुंबई आणि महाराष्ट्रावर घोंघावणाऱया अदानी संकटाविरोधात मतदारांचा रोष आज बाहेर आला. कंबरतोड महागाई, वाढती बेरोजगारी, महिलांवरील अत्याचार रोखण्यात अपयशी ठरलेल्या राज्यातील मिंधे-भाजप सरकारला हद्दपार करण्यासाठी भरभरून मतदान झाले. शहरी आणि ग्रामीण भागात भरभरून मतदान झाले. विधानसभेच्या 288 जागांसाठी सरासरी 65 टक्के मतदान झाले. सत्तापालट करण्याच्या दृष्टीनेच इतक्या मोठय़ा प्रमाणात मतदान झाल्याचे राजकीय पंडितांचे मत आहे. नक्षलग्रस्त गडचिरोलीतील आरमोरी मतदारसंघात सर्वाधिक 74.50 टक्के मतदान झाले. मुंबईसह राज्यात गेल्यावेळीच्या तुलनेत मतदानात सरासरी 4 टक्क्यांनी वाढ झाली. 4134 उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले असून शनिवारी निकाल जाहीर होणार आहे.

सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. सुरुवातीच्या टप्प्यात मतदारांचा प्रतिसाद चांगला होता. मतदान केंद्रांबाहेर मतदानासाठी रांगा लागल्या होत्या. दुपारच्या सुमारास मतदानाचा वेग मंदावल्यासारखा दिसत होता, परंतु दुपारी 3 नंतर पुन्हा मतदान केंद्रे मतदारांच्या गर्दीने फुलून गेली. सर्वसामान्य मतदारांबरोबरच अनेक मान्यवर आणि सेलिब्रिटींनीही आपला मतदानाचा हक्क बजावला.

निवडणूक आयोगाने मतदारांमध्ये मतदानाबाबत मोठय़ा प्रमाणात केलेली जनजागृती आणि ज्येष्ठ व दिव्यांग मतदारांना मतदान केंद्रांपर्यंत आणण्याची चोख व्यवस्था यामुळेही मतदानाची टक्केवारी वाढण्यास कारणीभूत ठरली. महिला मतदारांनी मोठय़ा प्रमाणात मतदान केल्याचे निवडणूक अधिकाऱयांनी सांगितले. अनेक मतदारसंघांमध्ये बाचाबाची, मारहाण, राडा, ईव्हीएम मशीन्समध्ये बिघाड अशा घटना घडल्या. ईव्हीएम मशीन्सची तोडफोड झाल्याचेही प्रकार घडले. ते वगळता इतरत्र मतदान शांततेत आणि सुरळीत पार पडले. आचारसंहिता भंगाच्याही अनेक तक्रारी निवडणूक आयोगाकडे नोंदल्या गेल्या.

पालघरमध्ये रात्री उशिरापर्यंत मतदान

पालघरमध्ये सायंकाळी 6 वाजून गेल्यानंतरही काही मतदान केंद्रांबाहेर रांगा लागल्या होत्या. नियमानुसार 6 वाजेपर्यंत मतदान केंद्रावर आलेल्या मतदारांना आतमध्ये घेऊन त्यांचे मतदान पूर्ण करण्यात आले. काही केंद्रांवर ही प्रक्रिया रात्री 8 वाजेपर्यंत सुरू होती.

मुंबईकरांचेही भरभरून मतदान

मतदानासाठी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली होती. मतदान केंद्रांची संख्याही वाढविण्यात आली. मुंबईत अनेक गृहनिर्माण सोसायटय़ांमध्येही मतदान केंद्रे उभारण्यात आली. त्याचा सकारात्मक परिणाम दिसून आला. सकाळपासूनच मतदान केंद्रांवर रांगा लागल्या. मुंबईत गेल्यावेळी 51 टक्के मतदान झाले होते. त्यात यावेळी 4 टक्क्यांनी वाढ झाली.

कमळाचे बटण दाबा सांगणाऱया अधिकाऱयाला चोप

कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात एका मतदान केंद्रावर निवडणूक अधिकारी मतदारांना कमळाचे बटण दाबा असे सांगत होता. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी या अधिकाऱयाला चोप दिला आणि अधिकारी बदलण्याची मागणी केली.

परळीत ईव्हीएम फोडले

परळी-वैजनाथ मतदारसंघात घाटनांदूर येथे मतदान केंद्रावर काही तरुणांनी 4 ईव्हीएम फोडली. केंद्राध्यक्षाला मारहाण करण्यात आली. दरम्यान, ईव्हीौएम फोडण्यात आली असली तरी त्यातील मते सुरक्षित आहेत. तिथे दुसरी ईव्हीौएम बसवण्यात आली आहेत, असे निवडणूक अधिकाऱयांनी स्पष्ट केले.

वेब कास्टिंगद्वारे नजर

राज्यांत बहुतांश मतदान केंद्रांवर मतदान सुरळीत पार पडते की नाही यावर वेब कास्टिंगद्वारे नजर ठेवण्यात आली होती.

कराळे मास्तरांना मारहाण

वर्ध्यातील मांडका गावात मतदान करून परतताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नीलेश कराळे मास्तरांकर हल्ला करून त्यांना मारहाण करण्यात आली. भाजपने पोसलेल्या आणि माजलेल्या लोकांनी हा हल्ला केला, असा आरोप कराळे मास्तरांनी केला.

जिल्हानिहाय मतदानाची टक्केवारी

नगर 71.73
अकोला 62.23
अमरावती 65.57
छत्रपती संभाजीनगर 67.05
बीड 65.71
भंडारा 68.12
बुलढाणा 70.32
चंद्रपूर 70.38
धुळे 64.70
गडचिरोली 73.68
गोंदिया 67.91
हिंगोली 71.10
जळगाव 63.29
जालना 72.30
कोल्हापूर 76.25
लातूर 66.92
मुंबई शहर 52.07
मुंबई उपनगर 55.77
नागपूर 60.49
नांदेड 64.92
नंदुरबार 69.15
नाशिक 67.57
धाराशीव 64.27
पालघर 65.69
परभणी 70.38
पुणे 60.70
रायगड 65.97
रत्नागिरी 64.65
सांगली 71.79
सातारा 71.71
सिंधुदुर्ग 66.36
सोलापूर 67.26
ठाणे 56.05
वर्धा 68.30
वाशीम 66.01
यवतमाळ 69.02