कणकवली विधानसभा मतदारसंघातील देवगड तालुक्यात सकाळी 7 वाजल्यापासून मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला. देवगड-जामसांडे नगरपंचायत हद्दीतील सर्वच मतदान केंद्रांवर सकाळी 7 वाजल्यापासून मतदारांनी मतदानाकरिता रांगा लावल्या होत्या.मतदान प्रक्रिया पार पाडण्याकरिता अपेक्षित कालावधीपेक्षा अधिक वेळ जात असल्यामुळे दुपारी 11 वाजेपर्यंत साधारणतः सरासरी 21 टक्के एवढे मतदान झाले होते. त्यानंतर दुपारी एक वाजेपर्यंत या टक्केवारीत वाढ होऊन सुमारे 40 टक्के एवढे मतदान झाले.
देवगड तालुक्यातील मतदान केंद्र क्रमांक 99 लिंगडाळ गाव या ठिकाणी मतदानास प्रारंभ होताच पहिल्याच मतदानाप्रसंगी मतदान यंत्र बंद पडल्यामुळे त्या ठिकाणी मतदान प्रक्रिया सुरळीत करण्याकरता सुमारे एक ते दीड तास एवढा कालावधी वाया गेला.
उमेदवारांनी बूथला दिल्या भेटी
महाविकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर, सुशांत नाईक यांनी बूथला भेट दिली. महाविकास आघाडीच्या वतीने नगरसेवक बुवा तारी, विशाल मांजरेकर, नितीन बांदेकर, संतोष तारी, तेजस मामघाडी यांच्या समवेत विभागप्रमुख विकास कोयंडे, दिनेश पारकर, बाळू बांदेकर, विशाल कोयंडे, महिला संघटक निकिता जोशी तसेच अन्य शिवसैनिक कार्यरत होते. तसेच प्रशासनाच्या वतीने जामसंडे येथे युवा मतदान केंद्राची निर्मिती करण्यात आली होती. यावेळी जास्तीत जास्त युवा मतदारांना आकर्षित करण्यासाठी केंद्राची उभारणी करण्यात आली असल्याची माहिती झोनल ऑफिसर सूरज कांबळे यांनी दिली. यावेळी अनेक प्रथम मतदानाचा हक्क बजावणाऱया युवकांनी आपला सेल्फी घेत एक प्रकारे आनंद साजरा केला.