गौतमच्या पोलीस कोठडीत वाढ; अन्य आरोपी न्यायालयीन कोठडीत, बाबा सिद्दिकी हत्या प्रकरण

राष्ट्रवादी काँगेसचे (अजित पवार गट) नेते बाबा सिद्दिकी यांच्या हत्येप्रकरणातील मुख्य आरोपी शिवकुमार गौतमच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली आहे, तर अन्य आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

गौतमसह गौरव अपुने, अदित्य गुंणकर, रफिक शेख, अनुराग कश्यप, ग्यान त्रिपाठी, आकाश श्रीवास्तवा व अखिलेंद्र पवन सिंग या आरोपींच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्याने गुन्हे शाखेने त्यांना महानगर दंडाधिकारी न्यायालयात हजर केले.

गौतमने सिद्दिकी यांच्यावर ज्या शस्त्राने गोळीबार केला ते अद्याप सापडलेले नाही. तो तपासातही सहकार्य करत नाही. त्याच्या पोलीस कोठडीत वाढ करावी, अशी विनंती गुन्हे शाखेने दंडाधिकारी न्यायालयात केली. ती मान्य करत न्यायालयाने गौतमच्या पोलीस कोठडीत 23 नोव्हेंबर 2024 पर्यंत वाढ केली.

12 ऑक्टोबर 2024 रोजी सिद्दिकी यांची गोळय़ा झाडून हत्या करण्यात आली. बिष्णोई टोळीने ही हत्या घडवून आणल्याचा आरोप आहे. पोलिसांनी कारवाई करत तब्बल 25 आरोपींना अटक केली आहे. अद्याप या हत्येमागचा हेतू समोर आलेला नाही.