जयपूर-डेहराडून इंडिगो एअरलाईन्सच्या 6 ई-7468 विमानाच्या इंजिनात 18 हजार फुटांवर तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे विमान तब्बल अर्धा तास हवेतच होते. यादरम्यान विमानातील 70 प्रवाशी प्रचंड घाबरले. परंतु वैमानिकाने विमान सुरक्षित लँड केल्यानंतर प्रवाशांचा जीव भांडय़ात पडला. इंडिगो एअरलाइन्सचे विमान 19 नोव्हेंबर रोजी जयपूर विमानतळावरून सायंकाळी 5 वाजून 44 मिनिटांनी डेहराडूनसाठी टेक ऑफ करणार होते. परंतु तांत्रिक कारणांमुळे विमानाने 40 मिनिटे उशिरा म्हणजेच 6 वाजून 35 मिनिटांनी उड्डाण केले. सुमारे 25 मिनिटांनंतर इंजिनात बिघाड झाला. वैमानिकाने दिल्लीच्या हवाई नियंत्रण विभागाशी संपर्क साधला आणि इमर्जन्सी लँडिंगसाठी परवानगी मागितली. दिल्ली एटीसीने अर्ध्या तासानंतर इमर्जन्सी लँडिंगसाठी परवानगी दिली.