कोकणात शांततेत मतदान; वृद्ध आणि दिव्यांगानाही बजावला अधिकार

महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीसाठी बुधवारी मतदान प्रक्रिया पार पडली. मतदानामध्ये वृध्द आणि दिव्यांगाचा उत्साह बघायला मिळाला. 85 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना घरूनच मतदान करण्याची सुविधा देण्यात आली होती. मात्र काही ज्येष्ठ नागरिकांनी मतदान केंद्रांवर मतदान केले. दापोली तालुक्यात 104 वर्षांच्या रामचंद्र महिमाजी साळवी यांनी मतदान केंद्रावर येऊन मतदानाचा हक्क बजावला. दाभोळ येथे 98 वर्षांच्या मधुकर लुकतुके यांनी मतदानाचा हक्क बजावला. राजापूर तालुक्यातील खरवते येथे 95 वर्षांच्या यशोदा धर्माजी सौरभ यांनी मतदानाचा हक्क बजावला. चिपळूणातील खेर्डी मतदान केंद्रावर 94 वर्षांच्या पार्वतीबाई गोपाळ कासार यांनी मतदानाचा हक्क बजावला.

दापोली तालुक्यातील पाजपंढरी येथे मोठ्या संख्येने दिव्यांग मतदार आहेत. या दिव्यांग मतदारांनी मतदार केंद्रावर जावून आपल्या मतदानाचा हक्क बजावला. दापोली तालुक्यातील पाजपंढरी या गावात पोलीओ आजाराने त्रस्त असलेल्या दिव्यांग मतदारांची खूपच मोठी संख्या आहे. अशा येथील दिव्यांग मतदारांनी आपल्या नातेवाईकांच्या तसेच निवडणूक कर्मचा-यांच्या सहाय्याने विधानसभा निवडणुकीतील मतदानाचा आपला पवित्र हक्क बजावला. दापोली पोलिसांनी तालूक्यात चोख बंदोबस्त ठेवल्याने कोणतीही अनुचित घटना घडली नाही.