उत्तर प्रदेशात पोलीस अधिकाऱ्याने रिव्हॉल्व्हर दाखवून मतदारांना धमकावले, अखिलेश यादव यांनी व्हिडिओ केला शेअर

आज महाराष्ट्रासह उत्तर प्रदेशात विधानसभेच्या 9 जागांवर आज पोटनिवडणूक होत आहे. यातच येथील मीरपूरमधून एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत दिसत आहे की, एक पोलीस अधिकारी रिव्हॉल्व्हर दाखवून मतदारांना धमकावत आहे. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी हा व्हिडिओ आपल्या ‘एक्स’ अकाउंटवर शेअर केला आहे.

हा व्हिडिओ शेअर करताना अखिलेश यादव म्हणाले आहेत की, ”निवडणूक आयोगाने मीरापूरच्या ककरौली पोलीस स्टेशन परिसरातील एसएचओला तात्काळ निलंबित करावे, कारण ते रिव्हॉल्व्हर दाखवून मतदारांना मतदान करण्यापासून रोखत आहे.”

याआधीही अखिलेश यादव यांनी ‘एक्स’वर आणखी एक पोस्ट शेअर केली होती. यामध्ये त्यांनी इब्राहिमपूरमध्ये महिलांना मतदान करण्यापासून रोखण्यासाठी अपमानास्पद भाषा आणि वर्तन करणाऱ्या एसएचओवर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली होती.

पोटनिवडणुकीच्या मतदानादरम्यान अखिलेश यादव यांनी पत्रकार परिषदेत सांगितले होते की, भाजपला ही पोटनिवडणूक मतांनी नाही तर चुकीच्या पद्धतीने जिंकायची आहे. पराभवाच्या भीतीने भाजप प्रशासनावर बेईमान करण्यासाठी दबाव आणत आहे. ते म्हणाले की, मी मतदारांना आवाहन करतो की, तिथेच राहा आणि या आणि मतदान करा.