महाराष्ट्राच्या निवडणुकीसाठी गुजरातचे 10 हजार होमगार्ड तैनात; निवडणूक आयोगाच्या हेतूवरच प्रश्नचिन्ह

महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीसाठी बुधवारी मतदान होत आहे. मतदान प्रक्रिया निःपक्षपातीपणे आणि पारदर्शक वातावरणात सुरळीत होण्यासाठी निवडणूक आयोगाने जय्यत तयारी केली आहे. तसेच कडेकोट सुरक्षा व्यवस्थाही ठेवण्यात आली आहे. पोलीस दलासह राज्य राखीव दल ,केंद्रीय सुरक्षा दलाचे जवान सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले आहेत. मात्र, यासाह गुजरात होमगार्डचे तब्बल 10 हजार जवान निवडणुकीसाठी महाराष्ट्रात तैनात करण्यात आल्याने जनतेत रोष आहे. गुजरात होमगार्डचेच जवान महाराष्ट्रात का तैनात करण्यात आले? इतर राज्यांचे जवान का तैनात करण्यात आले नाहीत? असे प्रश्न उपस्थित करत यामागच्या हेतूवरच शंका व्यक्त केली जात आहे

महाराष्ट्रात निवडणूक प्रक्रियेसाठी गुजरातमधून तब्बल 90 हजार कार्यकर्त्यांची फौज गुजरातमधून महाराष्ट्रात आल्याचे वक्तव्य भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केले होते. त्यावर महाराष्ट्रातील भाजप कार्यकर्त्यांवर पक्षाचा विश्वास नसल्याची टीका विरोधकांनी केली होती. तसेच भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांमध्येही रोष होता. आता जनतेचा रोष आणखी वाढवणारी बातमी उघड झाली आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने गुजरातमधील 10,000 होमगार्ड जवान आणि 250 होमगार्ड अधिकारी तैनात केले आहेत. यात महाराष्ट्राला लागून असलेल्या वलसाड जिल्ह्यातील 250 होमगार्ड जवानांना धुळे जिल्ह्यात निवडणुकीसाठी तैनात केले आहे. तसेच मुंबईसह राज्यातील इतर जिल्ह्यातही गुजरात होमगार्डचे जवान दिसत आहेत.

आता महाराष्ट्रातील निवडणुकीसाठी गुजरातमधून होमगार्ड मागवण्यात आल्याने जनतेत रोष आहे. महाराष्ट्रावर अप्रत्यक्षपणे गुजरातचे वर्चस्व लादण्याचा हा प्रयत्न असल्याचा संताप जनतेतून व्यक्त होत आहे. महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला पळवल्याने आधीच राज्यातील जनतेत रोष असताना आता निवडणुकीतही गुजरातचे होमगार्ड तैनात करण्यात आल्याने प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत आहे.