महाराष्ट्राचं अदानीराष्ट्र बनवायचं नसेल तर मराठी माणसानं सावध रहावं आणि मतदान करावं; संजय राऊत यांचे आवाहन

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी 288 मतदारसंघात मतदान सुरू आहे. सकाळी 7 वाजल्यापासून मतदान केंद्राबाहेर मतदारांनी रांगा लावल्या आहेत. सामान्य नागरिकांसह राजकीय, सामाजिक आणि सिनेक्षेत्रातील दिग्गजांनीही मतदानासाठी गर्दी केली आहे. शिवसेना नेते (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनीही विक्रोळीत मदतानाचा हक्क बजावला. तत्पूर्वी माध्यमांशी संवाद साधत संजय राऊत यांनी महाराष्ट्राचे अदानीराष्ट्र बनवायचे नसेल तर मराठी माणसाने सावध रहावे आणि मतदान करावे असे आवाहन केले.

संजय राऊत म्हणाले की, संयुक्त महाराष्ट्राच्या काळात जी निवडणूक झाली त्याची आठवण करून देणारी ही निवडणूक आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यावेळी मुंबई, महाराष्ट्र टिकवण्यासाठी, महाराष्ट्रातील मराठी माणसाचे हक्क शाबूत ठेवण्यासाठी निवडणूक झाली आणि त्यात महाराष्ट्राचा विजय झाला. महाराष्ट्राचे व्यापाऱ्यांच्या माध्यमातून विकृतीकरण सुरू आहे. आम्ही उघडपणे म्हणतो की महाराष्ट्राचे अदानीराष्ट्र बनवायचे नसेल तर मराठी माणसाने सावध रहावे आणि मतदान करावे. ही निवडणूक महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची असून महाराष्ट्रात व्यापार मंडळाकडून झालेल्या अतिक्रमणाविरोधात आम्ही लढत आहोत.

कधी नव्हे इतक्या पैशाचा पाऊस या निवडणुकीत पडतो आहे. मंगळवारी रात्री मागाठाणे येथे मिंधे गटाच्या नेत्याकडे मोठी रक्कम सापडली. त्याआधी नाशिकला हॉटेल ताजमध्ये कोट्यवधी रुपये सापडले. त्यानंतर विरारला असेच नाट्य झाले. ठिकठिकाणी फक्त पैसे.. पैसे.. आणि पैसे. महाराष्ट्रात आताएवढा पैशाचा वापर कधीच झाला नाही. खोक्यानंतर आता कंटेनर आले आहेत. हे राज्य व्यापाऱ्यांच्या हाती देण्यासाठी काही लोक निवडणूक लढत असून मराठी माणसाने सावध रहावे आणि मतदान करावे, असे आवाहन संजय राऊत यांनी केले.

Maharashtra Assembly Election Live – महाराष्ट्रात 9 वाजेपर्यंत 6.61 टक्के मतदान

विरारमध्ये झालेला प्रकार अत्यंत गंभीर आहे. पण काल पैसे वाटल्याबद्दल गुन्हा दाखल झाला नाही. निवडणूक आयोग म्हणतो की आम्ही निपक्षपातीपणे काम करतो. पण जिथे पैसे सापडले, तिथे स्थानिक आमदार व त्यांच्या कार्यकर्त्यांनी पैसे पकड्यानंतरही आचारसंहितेत पत्रकार परिषद घेतली या किरकोळ प्रकरणाच गुन्हा दाखल झाला, असा आरोप संजय राऊत यांनी केला.

ते पुढे म्हणाले की, नाशिकच्या पंचतारांकित हॉटेलमध्ये पैसे पकडण्यात आले. त्याआधी अनिल देशमुख यांच्यावर हल्ला झाला. दोन्ही चर्चांवरील लक्ष उडवण्यात यावे म्हणून विरारमध्ये तावडे पैसे घेऊन आल्याची टीप दिली. त्यानंतर हा गोंधळ सुरू झाला. भाजपचे लोक पैसे वाटण्यात अत्यंत चाणाक्ष आणि हुशार आहेत. देशभरात पैशाचे वाटप कसे करावे याचे उत्तम ज्ञान भाजपकडे असल्याने विनोद तावडेंसारखे कसलेला खेळाडू काही चूक करेल असे वाटत नाही. पण ही चूक का झाली? कारण त्यांच्याच सरकारमधील काही लोकांनी माहिती दिली की तिथे पैसे वाटप सुरू आहे.

मिंधे गटाचा राम रेपाळे नावाचा एक माणूस आहे. त्याच्या गाडीत पैसे असतात. चार गाड्या पैसे भरून तो येतो आणि पैसे वाटप करून सहीसलामत जातो. मुंबईत ठिकठिकाणी पैसे वाटण्यासाठी मिंधे गटाने खास माणसे ठेवलेली आहेत. ती ठाण्यातून येतात. त्यांची अडवणूक होत नाही, त्यांच्या गाड्या तपासल्या जात नाहीत. ते येतात, पैसे वाटतात, डायरीत हिशेब लिहितात आणि निघून जातात. या राज्याला अधोगतीला नेण्याचा प्रकार आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली.