Maharashtra Assembly Election 2024 – सुप्रिया सुळे यांची सायबर सेलमध्ये तक्रार, भाजपला मानहानीची नोटीस पाठवणार

भाजपच्या बिटकॉईन स्कॅमवर राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पलटवार केला आहे. त्यांनी बिटकॉईन स्कॅमबाबतचे सर्व आरोप फेटाळले असून त्या ऑडिओत माझा आवाज नाही, असे स्पष्ट केले आहे.  शिवाय मी सायबर सेलमध्ये तक्रार दाखल केली असून भाजपला मानहानी नोटीस पाठवणार असल्याचे सुप्रिया सुळे एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना म्हणाल्या.

महाराष्ट्रात आज सकाळी 7 वाजल्यापासून विधानसभेच्या मतदानाला सुरुवात झाली आहे. मतदानाच्या पूर्वसंध्येला भाजपने सुप्रिया सुळे यांच्यावर निवडणुकीत परकीय चलन वापरल्याचा आणि अनेक आर्थिक व्यवहारांसाठी बिटकॉईनचा वापर केल्याचा आरोप केला. पुरावे म्हणून रेकॉर्डींग्स आणि स्क्रिनशॉट्स दाखवल्याने खळबळ उडाली होती. मात्र बिटकॉईन स्कॅमवर सुप्रिया सुळे म्हणाल्या, भाजपचेच हे सारे आरोप आहेत जे निराधार आहेत. सुप्रिया सुळेंची सर्वात मोठी ताकद तिची इमानदारी आहे. मी मिस्टर सुधांशू त्रिवेंदीसोबत कुठेही बसू शकते. त्यांनी वेळ, जागा ठरवावी मी सांगतील तिथे आणि सांगतील त्या व्यासपीठावर चर्चा करायला येईन असे आव्हानच सुप्रिया सुळे यांनी यावेळी केले.

भाजप नेते विनोद तावडे यांच्या पैसै वाटप प्रकरणावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, एका सशक्त लोकशाहीसाठी ही फार खेदजनक बाब आहे. विनोद तावडे हे महाराष्ट्राचे नाही तर देशातील मोठे नेते आहेत. जर पैसे वाटूनच मतं खरेदी करायची आहेत, मग लोकशाही कसली? असा सवाल करत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला कालच्या या प्रकाराने धक्का पोहोचवला असल्याचा संताप सुप्रिया सुळे यांनी यावेळी व्यक्त केला.