गाडीवर केलेल्या दगडफेकीत डोक्याला गंभीर दुखापत झालेले माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांना आज संध्याकाळी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. यावेळी अनिल देशमुखांवर तुम्ही गोटे मारा किंवा गोळय़ा झाडा, अनिल देशमुख मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही. मी सगळय़ांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा अनिल देशमुख यांनी दिला. दरम्यान, या हल्ल्यामागे भाजपचा हात असल्याचा आरोप माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला होता.
रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर अनिल देशमुख यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी हा इशारा दिला. देशमुख यांच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणात चार अज्ञात युवकांविरुद्ध खून करण्याचा प्रयत्न करणे या कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास काटोलच्या उपविभागीय पोलीस अधिकाऱयांकडे देण्यात आल्याची माहिती नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी दिली आहे.