अर्धवट गृहनिर्माण प्रकल्पामुळे विस्थापित; दादरकरांची नाराजी महायुतीला भोवणार

दादर, शिवाजी पार्क, माहीममधील किमान 27 जुन्या इमारतींचे काम अपूर्णावस्थेत आहे. बिल्डरने काम बंद केले. भाडे बंद केले. आता किमान चार ते पाच हजार रहिवासी या मतदारसंघातून विस्थापित झाले आहेत. दादरमधील मोक्याची जागा सोडून दूर उपनगरात जाऊन वास्तव्य करण्याची वेळ आली आहे. या नाराज रहिवाशांचा लोकसभा निवडणुकीत महायुतीला मोठा झटका दिला होता. आताही विस्थापित झालेल्या या रहिवाशांच्या नाराजीचा महायुतीला मोठा फटका बसण्याची चिन्हे आहेत.

दादर, माहीममधील जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने ऐरणीवर आलेला आहे. दादर, शिवाजी पार्कमधील मोक्याच्या जागेवरील इमारतीमधील रहिवाशांनी हक्काच्या नव्या घराचे स्वप्न पाहिले. नवीन घराच्या आशेने जुनी घरे रिकामी केली. पण काही बिल्डरांना अटक झाली, तर काही बिल्डर कफल्लक झाले. त्यामुळे गृहनिर्माण प्रकल्प गेल्या काही वर्षांपासून रखडले आहेत.

महायुतीच्या बैठका, पण प्रश्न तसाच

दादर, शिवाजी पार्क, माहीममधील अर्धवट पडलेले प्रकल्प मार्गी लावण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठक बोलावली होती. स्थानिक आमदारांनी शिवाजी मंदिरमध्ये दोन-तीन बैठका घेतल्या, पण प्रकल्प काही मार्गी लागलेले नाहीत. अपूर्ण प्रकल्प म्हाडामार्फत पूर्ण करण्याची या सरकारने घोषणा केली. पण अजून एकाही इमारतीच्या पुनर्विकासाचे काम सुरू झालेले नाही.

मतदानासाठी येण्याची शक्यता कमी

दादरच्या रानडे रोडवरील आर. के. बिल्डिंग क्रमांक एक आणि दोन, गोखले रोडवरील अहमद बिल्डिंग, समाधान बिल्डिंग, मोहम्मदी बिल्डिंग, बाळकृष्ण सदन, कन्नाडा मॅन्शन आणि शेजारच्या दोन-तीन बिल्डिंगचा समूह विकास होणार होता, पण तोही रखडला आहे. ही सर्व कुटुंबे मुंबईच्या उपनगरात आणि गावी स्थलांतरित झाली आहेत, हे मतदार मतदानासाठी येण्याची शक्यता कमी आहे.

छप्रा आणि मोहसीन बिल्डिंग रखडल्या

दादरच्या प्लाझा चित्रपटगृहासमोरील छप्रा आणि मोहसीन बिल्डिंग गेल्या अनेक वर्षांपासून अपूर्णावस्थेत आहेत. छप्रा इमारतीमधील सुमारे 156 कुटुंबे वसई, विरार, अंबरनाथ अशा ठिकाणी विखुरली आहेत. काही जण गावी गेले. नवीन घराच्या आशेवर तर किमान 40 जणांनी प्राण सोडला आहे. छप्रा बिल्डिंग   2007 मध्ये, तर मोहसीन बिल्डिंग 2009 मध्ये तोडली. पुढे बिल्डरला अटक झाली. त्यानंतर काम बंद पडले. आता तर या इमारतीचा नुसता सांगाडा आहे. भाडे बंद झाले, हातात पैसे नाही. त्यामुळे काही कुटुंबांनी या इमारतीत आसरा घेतला आहे.

माहीम मतदारसंघातील किमान 27 गृहनिर्माण प्रकल्प बंद पडल्याची माहिती विद्यमान आमदारांनीच मार्च 2022 मधील विधिमंडळाच्या अधिवेशनात दिली होती. हे प्रकल्प बंद पडल्यामुळे किमान चार ते पाच हजार कुटुंबे देशोधडीला लागल्याचे त्यांनी विधानसभेत सांगितले होते.