विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला अवघे काही तास शिल्लक असताना धारावीत मंदिराचा गेट पाडण्याची नोटीस दिली असताना मंदिर पाडण्याची नोटीस दिल्याची पोस्टर लावून सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न केला गेला. मुंबई महापालिकेने मंदिराबाबत नोटीस बजावली असून हा आचारसंहितेचा भंग नाही का, एका रात्रीत एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर पोस्टर कशी लागली, पोलीस काय करत होते, असा संतप्त सवाल करून निवडणूक आयोगाने निष्पक्षपातीपणे चौकशी करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी केली आहे.
मंदिरावर लावलेल्या पोस्टरवरून वर्षा गायकवाड यांनी भाजपवर ताशेरे ओढले आहेत. देशात ‘बटेंगे तो कटेंगे’ घोषणा देणारेच समाजात फूट पाडून विभाजन करण्याचे काम करत आहेत. प्रचार संपताच सत्ताधारी भाजप युतीकडून फेक नेरेटिव्ह पसरवले जात आहे. धारावीत मोठय़ा प्रमाणावर पोस्टर्स लावले जात असताना पोलीस काय करत होते, ही नोटीस भाजप युतीच्या ताब्यात असलेल्या मुंबई महापालिकेने दिली आहे. मग मंदिराच्या विरोधात भाजप युतीच आहे असे मानायचे का, असा सवाल वर्षा गायकवाड यांनी केला आहे.