खोकेसुर, भ्रष्टासुरांची राजवट संपू दे! उद्धव ठाकरे यांचे आई तुळजाभवानीला साकडे

महाराष्ट्रात खोकेसुर, भ्रष्टासुर मातलेत. त्यांची राजवट संपवून महाराष्ट्राच्या संस्कृतीला साजेसे राज्य येऊ दे! असे साकडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कुलस्वामिनी आई तुळजाभवानीला घातले.

निवडणूक प्रचाराची धामधूम संपल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, सौ. रश्मी ठाकरे यांनी तुळजापुरात कुलस्वामिनी आई तुळजाभवानीचे दर्शन घेतले. याप्रसंगी ठाकरे कुटुंबाचे पारंपरिक पुजारी कुमार इंगळे, सागर इंगळे यांनी पौरोहित्य केले. दर्शन झाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील खोकेसुरांचे राज्य जाऊन महाराष्ट्राच्या संस्कृतीला साजेसे सरकार येऊ दे, अशी प्रार्थना केल्याचे सांगितले.

यावेळी शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार पैलास घाडगे-पाटील, सहसंपर्कप्रमुख मकरंद राजेनिंबाळकर, महिला आघाडीच्या शामल वडणे, तालुकाप्रमुख जगन्नाथ गवळी, शहरप्रमुख सुधीर कदम आदी उपस्थित होते.

कुलस्वामिनी तुळजाभवानीचे दर्शन घेण्यासाठी उद्धव ठाकरे यांचे खासगी विमानाने सोलापूर येथे आगमन झाले. यावेळी विमानतळावर त्यांची बॅग तपासण्यात आली. त्याचाच संदर्भ घेत उद्धव ठाकरे यांनी, माझी बॅग तपासली, त्यात काहीच सापडले नाही. पण विनोद तावडे यांच्या बॅगेत पैसे सापडल्याचे कळते, असा टोला लगावला. काल अनिल देशमुख यांच्यावर हल्ला झाला, तो दगड शोधण्याचे काम कुणी करायचे, असा संतप्त सवालही त्यांनी केला.