पैसा बाटेंगे और जितेंगे हेच भाजपाचे धोरण ,तावडे तावडीत सापडले ते भाजपातील गँगवॉरमुळे; उद्धव ठाकरे यांचा जोरदार हल्ला

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना भाजपच्या खोके वाटपावर जोरदार हल्ला चढवला. विनोद तावडे यांचा पैसे वाटतानाचा व्हिडीओ समोर आला असेल तर निवडणूक आयोगाने तो पाहायला हवा. हे जादूचे पैसे कुठून आले, कुणाच्या खिशात पैसे जात होते, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. विनोद तावडे तावडीत सापडले असतील तर आतापर्यंत त्यांनी सरकारे कशी पाडली अन् बनवली त्याचा हा पुरावा आहे, असे सांगतानाच, भाजपा, मिंधे आणि अजित पवार यांचा हा नोट जिहाद आहे, पैसा बाटेंगे और जितेंगे असे काही आहे, याचा फैसला उद्या महाराष्ट्रच करेल, असा इशाराही उद्धव ठाकरे यांनी दिला.

विनोद तावडे पैसा वाटतात हे ज्यांनी जागरुकतेने उघडकीस आणले असेल त्यांचे मी काwतुक करतो, असे उद्धव ठाकरे म्हणाले. कदाचित हे भाजपमधील आपापसातील गँगवारसुद्धा असू शकेल किंवा मिंधे आणि भाजपमधीलही असू शकेल, अशी शक्यताही उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली.

मिंधे सरकारच्या योजना किती फसव्या आहेत हे आता महाराष्ट्राने बघितले पाहिजे. एका बाजूला बहिणीला 1500 आणि दुसऱया बाजूला यांना मात्र थप्प्याच्या थप्प्या चालल्या आहेत. संपूर्ण महाराष्ट्राने हे उघडय़ा डोळ्याने पाहिले आहे, त्यामुळे महाराष्ट्रच उद्या काय तो निर्णय घेईल, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

 भाजपा आणि मिंधे निवडणूक जिंकण्यासाठी वाट्टेल त्या स्तरावर चालले आहेत. अत्यंत निर्घृण पद्धतीने राजकारण करत आहेत, असा हल्लाबोल करताना उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा दाखला यावेळी दिला. अनिल देशमुख यांच्यावर भ्याड हल्ला झाला, तो कोणी केला, की आपोआप रस्त्यावरून दगड आला, की परग्रहावरून दगड आला त्याचे उत्तर काहीच मिळत नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले. तुळजाभवानीच्या दर्शनाला जाताना माझी बॅग तपासली, यांच्या बॅगेतले पैसे आणि यांचे दगड तपासणार कोण? असा संतप्त सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. विनोद तावडेप्रकरणी आयोगाने गुन्हा दाखल केला आहे म्हणतात, पण गुन्हा दाखल करून आरोपी फरार नाही झाला पाहिजे, असे ते म्हणाले.