रोहितने पर्थ कसोटी खेळावी, माजी कसोटीपटूचा कर्णधाराला आग्रह

रोहित शर्माचे कुटुंब पूर्ण झाल्याबद्दल मनापासून आभार. तो आता बाबा झाला आहे. त्याची एक जबाबदारी पूर्ण झालीय. आता त्याला आपल्या नेतृत्वाच्या जबाबदारीसाठी पर्थ कसोटीत खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाला रवाना व्हायला हवे, असा आग्रह माजी कसोटीपटू सुरिंदर खन्ना यांनी केला आहे.

बॉर्डर-गावसकर करंडक कसोटी मालिका हिंदुस्थानसाठी खूप महत्त्वाची आहे आणि न्यूझीलंडविरुद्धच्या निराशाजनक कामगिरीनंतर हिंदुस्थानची अवस्था फारशी चांगली नाहीय. तसेच हिंदुस्थानचा संघ प्रथमच ऑस्ट्रेलियात पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळतोय. हिंदुस्थानला जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम फेरीत पोहोचायचे असेल तर ऑस्ट्रेलियाला 4-1 ने नमवावे लागणार आहे. हिंदुस्थानचा संघ अद्याप एकदाही कसोटी अजिंक्यपद जिंकू शकलेला नाही. जर हिंदुस्थानला अंतिम फेरीत धडक मारायची असेल तर ऑस्ट्रेलियात जोरदार खेळ करावाच लागेल. त्यासाठी रोहित शर्माचे पर्थमध्ये खेळणेही गरजेचे असल्याचे मत खन्ना यांनी मांडले आहे. मला आठवतेय, जेव्हा माझे लग्न झाले होते तेव्हा मला रिसेप्शनच्या दिवशी एका सामन्यासाठी जायचे होते. मी जेव्हा माझ्या रूमवर पोहोचलो तेव्हा पहाटेचे 4 वाजले होते आणि माझ्या बायकोने मला एअरपोर्टवर जाण्यासाठी उठवले होते. खेळाबद्दल असलेली कटिबद्धता खेळाडूंनी पाळायला हवी, असेही खन्ना म्हणाले.