अन् टीम इंडियासाठी देवाला थांबविले! पर्थ कसोटीसाठी संघ जुळवाजुळव सुरूच

ऑस्ट्रेलियाविरुद्धची बहुप्रतीक्षित, बहुचर्चित बॉर्डर-गावसकर करंडक (बॉगाक) मालिका येत्या शुक्रवारपासून सुरू होतेय. या मालिकेसाठी हिंदुस्थानी संघ गेले तीन महिने कसून मेहनत करतोय. पण पर्थ कसोटी सुरू व्हायला आता 48 तास उरलेत तरी हिंदुस्थानी संघाची अकरा खेळाडूंची जुळवाजुळव संपलेली नाही. कर्णधार रोहित शर्माची अनिश्चित सुट्टी आणि त्यानंतर दुखापतींच्या भन्नाट माऱयामुळे संकटात सापडलेल्या हिंदुस्थानच्या फलंदाजांना बळ देण्यासाठी संघ व्यवस्थापनावर हिंदुस्थानी ‘अ’ संघातील आघाडीचा फलंदाज देवाला (देवदत्त पडिक्कल) थांबविण्याची बिकट स्थिती उद्भवली आहे.

त्यामुळे पर्थ कसोटीत हिंदुस्थानचा अंतिम अकरा जणांचा संघ कसा असेल याबाबत अद्यापही अनिश्चितता कायम आहे. कसोटी इतिहासात ‘अॅशेस’ मालिकेनंतर ‘बॉगाक’ मालिका सर्वात प्रतिष्ठsची मालिका मानली जाते. या मालिकेसाठी हिंदुस्थानी संघ गेले तीन महिने जोरदार सराव करत होता. या मालिकेसाठी दमदार संघ उभारता यावा म्हणून हिंदुस्थानने बांगलादेश आणि न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिकाही आयोजित केल्या. त्यापैकी बांगलादेशविरुद्ध हिंदुस्थानने 2-0 ने जोरदार विजयही मिळवला. न्यूझीलंडविरुद्ध 3-0 विजयाची अपेक्षा असलेल्या हिंदुस्थानी संघावर 0-3 ने पराभवाची नामुष्की सहन करण्याची पाळी ओढवली. या पराभवामुळे हिंदुस्थानी संघाचे मनोधैर्यही खचलेय. तरीही ऑस्ट्रेलियातील आव्हानांना तोंड देण्यासाठी हिंदुस्थानी संघ पोहोचलाय, पण त्यांना पहिल्याच कसोटीत सेनापतीशिवाय मैदानात उतरावे लागणार आहे. परिणामतः जसप्रीत बुमरावर संघाचे दुहेरी आव्हान असेल.

रोहितला पर्थवर खेळण्याचे आवाहन

कर्णधार रोहित शर्मा बाबा झाला ही निश्चितच आनंदाची बाब आहे. पण आता त्याने अडचणीत सापडलेल्या हिंदुस्थानी संघाला बळ देण्यासाठी पर्थ कसोटीत खेळायला हवे, असे आवाहन क्रिकेटप्रेमींकडून करण्यात आले आहे. ‘बॉगाक’ मालिका ही ‘अॅशेस’ मालिकेसारखी असल्यामुळे रोहितने पर्थ कसोटीपासूनच संघात खेळायला हवे. गिल दुखपातीमुळे बाहेर गेलाय. राहुलही पूर्णपणे फिट नाहीय. त्याची कामगिरीही निराशाजनक आहे. अशा संकटमय स्थितीत रोहित संघासोबत असायला हवा. त्यामुळे रोहितने तत्काळ पर्थला रवाना व्हावे, असेही आवाहन करण्यात आले आहे. रोहितबाबत अद्याप अनिश्चितता असली तरी तो पर्थ कसोटीनंतर ऑस्ट्रेलियात जाणार असल्याचे बोलले जात आहे.

शमीचा ऑस्ट्रेलिया दौरा लांबणीवर

ऑस्ट्रेलियन खेळपट्टय़ा नेहमीच वेगवान गोलंदाजीला पोषक असतात. त्यामुळे हिंदुस्थानी गोलंदाजीच्या ताफ्यात मोहम्मद शमी हे अस्त्रही असावे, अशी प्रत्येकाची इच्छा आहे. त्यासाठी मोहम्मद शमीने रणजी क्रिकेटमध्येही पुनरागमन केले. शमीचे पुनरागमन फारसे उत्साहावर्धक नसले तरी त्याला ऑस्ट्रेलिया दौऱयावर पाठवण्याची तयारीही सुरू झाली होती. मात्र शमीला आता अजून काही दिवस हिंदुस्थानातच थांबावे लागणार असल्याचे बीसीसीआय सूत्रांकडून समोर आले आहे. त्याने ऑस्ट्रेलियात दाखल होण्यापूर्वी आणखी देशांतर्गत सामने खेळावेत अशी संघ व्यवस्थापनाची इच्छा आहे. त्यामुळे 23 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱया सय्यद मुश्ताक अली टी-20 स्पर्धेत बंगालचे प्रतिनिधित्व करू शकतो. दुसरीकडे शमीला थांबविल्यामुळे बुमराचे आव्हान वाढणार आहे. त्याच्यावर संघाच्या नेतृत्वासह गोलंदाजीचीही मदार आहे. पर्थसाठी त्याच्या सोबतीला मोहम्मद सिराज आणि आकाश दीप गोलंदाजी करणार हे निश्चित आहे. मात्र चौथ्या गोलंदाजासाठी नितीश कुमार रेड्डी की हर्षित राणा की प्रसिध कृष्णा याचा निर्णय संघ व्यवस्थापन शेवटच्या क्षणीच घेण्याची शक्यता आहे.

आघाडीवीरांमध्ये झाली बिघाडी

एकीकडे शुबमन गिलचा अंगठा दुखावल्यामुळे हिंदुस्थानची आघाडीची फळीच कमकुवत झालीय. ती फळी बळकट करण्यासाठी संघ व्यवस्थापनाला चक्क हिंदुस्थानी ‘अ’ संघातील देवदत्त पडिक्कललाही पर्यायी व्यवस्था म्हणून थांबवण्यात आले आहे. तो आता पूर्ण दौरा ऑस्ट्रेलियातच असेल. ऑस्ट्रेलिया ‘अ’ विरुद्ध त्याने 36, 88, 26 आणि 1 अशा धावा केल्या होत्या तरीही त्याची हिंदुस्थानी संघात निवड करण्यात आली नव्हती. पण आता तो संघासाठी थांबलाय. मात्र संघ व्यवस्थापनाने ‘अ’ संघाचा कर्णधार ऋतुराज गायकवाडसह उर्वरित खेळाडूंना मायदेशी पाठवलेय. एकाच वेळी शर्मा आणि गिलच्या अनुपस्थितीमुळे हिंदुस्थानची सलामीची जोडी संकटात सापडली आहे. अपयशी असूनही के. एल. राहुलला सलामीला पाठवण्याची रणनीती आखली जात आहे. त्यातच त्याच्या हाताचा कोपराही दुखावला आहे. मैदानात सराव करताना दिसत असल्यामुळे त्याची दुखापत सामान्य मानली जात आहे. पर्थवर राहुल आणि सरफराजला विश्रांती देण्याची दाट शक्यता होती. मात्र आघाडीत झालेल्या बिघाडीमुळे आता ते दोघेही संघात दिसले तर कुणालाही आश्चर्य वाटणार नाही. ऑस्ट्रेलिया ‘अ’ विरुद्ध खणखणीत खेळी करणारा ध्रुव जुरेल यष्टिरक्षक म्हणून दौऱयावर आला आहे. पण संकटात सापडलेल्या फलंदाजीला बळ देण्यासाठी त्याला संधी मिळणार, हेसुद्धा निश्चित मानले जात आहे.