पिकांना किमान हमीभाव देण्यासोबतच विविध मागण्यांसाठी गेल्या 9 महिन्यांपासून हरयाणातील शंभू सीमेवर ठाण मांडून बसलेले शेतकरी आक्रमक झाले असून 6 डिसेंबरला दिल्लीच्या दिशेने कूच करणार आहेत. चंदिगड येथे झालेल्या शेतकऱ्यांच्या बैठकीत पुन्हा दिल्लीत धडक देण्याचा निर्णय घेण्यात आला. शंभू सीमेवरूनच दिल्लीला रवाना होणार आहेत. शेतकरी गेल्या 9 महिन्यांपासून गप्प बसले आहेत, मात्र सरकारकडून आमच्याकडे दुर्लक्ष केले जात असल्यामुळे आम्ही दिल्लीत धडक देण्याचा निर्धार केल्याचे शेतकरी नेते सर्वणसिंह पंधेर यांनी म्हटले आहे. यावेळी ट्रक्ट्रर किंवा ट्रॉली सोबत घेणार नाही तर गटातटात जाणार आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले.
भूमिका मांडण्याची संधी
आंदोलन करण्यासाठी आम्ही केंद्र सरकारकडे दिल्लीतील जंतरमंतर आणि रामलीला मैदानावर जागा मागितली आहे. आम्हाला एक संधी द्या म्हणजे आम्ही आमची भूमिका मांडू, असे शेतकऱ्यांनी म्हटले आहे. परंतु केंद्र सरकारने यावर अद्याप निर्णय घेतला नाही, असेही पंधेर यांनी म्हटले आहे.