आंध्र प्रदेशातील तिरुपती बालाजी मंदिराच्या तिरुमला तिरुपती देवस्थानने मंदिरात काम करणाऱ्या गैर-हिंदू कर्मचाऱ्यांसाठी एक ठराव मंजूर केला आहे. त्यानुसार मंदिर मंडळात काम करणाऱ्या गैर-हिंदू कर्मचाऱ्यांना स्वेच्छानिवृत्ती घेणे किंवा आंध्र प्रदेशातील अन्य सरकारी विभागात बदली करणे यापैकी एक निवडावे लागणार आहे. यावरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. दरम्यान, यापूर्वी मंदिरातील पवित्र प्रसादात भेसळ होत असल्याच्या बातम्यांवरून बराच गदारोळ झाला होता.
टीटीडी ही एक स्वतंत्र सरकारी ट्रस्ट असून जगातील सर्वात श्रीमंत हिंदू मंदिर तिरुमला व्यंकटेश्वर मंदिराचे व्यवस्थापन करते. टीटीडी कायद्यात अलीकडच्या काळात तीनवेळा सुधारणा करण्यात आल्या.
मंदिरातील कर्मचाऱ्यांच्या संख्येवर निर्णय नाही
मंदिरातील गैरहिंदू कर्मचाऱ्यांसाठीच्या ठरावाच्या वृत्ताला तिरुमला तिरुपती देवस्थानचे नवीन अध्यक्ष बी आर नायडू यांनी दुजोरा दिला आहे. मात्र, मंदिर मंडळात काम करणाऱ्या अहिंदू कर्मचाऱ्यांची संख्या नेमकी किती असेल याबाबत त्यांनी काहीही सांगण्यास नकार दिला आहे. टीटीडीच्या नव्या निर्णयामुळे बोर्डाच्या 7 हजार कायम कर्मचाऱ्यांपैकी सुमारे 300 कर्मचाऱ्यांवर या निर्णयाचा परिणाम होणार आहे.