तब्बल 1500 किलोमीटर अंतरापर्यंत डागता येणारे आणि आवाजापेक्षा 5 पट वेगाने लक्ष्य भेदणाऱ्या स्वदेशी हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेण्यात आली. डीआरडीओ अर्थात डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनने या लांब पल्ल्याच्या हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. एपीजे अब्दुल कलाम आझाद बेट क्षेपणास्त्र ओदिशाच्या किनाऱ्याजवळ एका ग्लाईडेड वाहनाने सोडण्यात आले. क्षेपणास्त्राच्या उड्डाण मार्गाचा मागोवा घेतल्यानंतर ही चाचणी यशस्वी झाल्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी एक्सवरून याबाबतची माहिती दिली.
मतदारांसाठी ‘डेमोक्रसी डिस्काऊंट’
नॅशनल रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ इंडिया (एनआरएआय) मुंबई विभागाने उद्या होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत अधिक मतदानाला प्रोत्साहन देण्यासाठी ‘डेमोक्रसी डिस्काऊंट’ हा विशेष उपक्रम सुरू केला आहे. या मोहिमेत मुंबईतील 50 हून अधिक रेस्टॉरंट सामील झाले असून जे मतदार मतदानाचा पुरावा दाखवतील ते या रेस्टॉरंटमधील जेवणात 20 टक्के सवलतीसाठी पात्र ठरतील, असे सांगितले आहे. 20 आणि 21 नोव्हेंबर 2024 पर्यंत ही ऑफर आहे.
हरिणी अमरसूर्या नव्या पंतप्रधान
हरिणी अमरसूर्या श्रीलंकेच्या पंतप्रधान बनल्या आहेत. श्रीलंकेत राष्ट्रपती अनुरा कुमार दिसानायके यांची आघाडी एनपीपीने विजय मिळवला होता. सोमवारी सरकारच्या नव्या मंत्रिमंडळाची स्थापना करण्यात आली. अमरसूर्या यांनी 1991 ते 1994 या काळात दिल्ली विद्यापीठाच्या हिंदू कॉलेजमध्ये शिक्षण घेतले. 5 वर्षांपूर्वीच त्यांनी राजकारणात प्रवेश केला. दोन महिन्यांपूर्वी स्थापन झालेल्या अंतरिम सरकारमध्येही त्या पंतप्रधान होत्या. राष्ट्रपती झाल्यानंतर दिसानायके यांनी त्यांना पंतप्रधान केले.
छत्तीसगडात 31 हत्तींचा धुडगूस
छत्तीसगडमधील रायगड जिह्यात तब्बल 31 हत्तींनी अक्षरशः धुडगूस घातला. या हत्तींच्या कळपाने एकाच दिवसात 49 शेतकऱ्यांची पिके उद्ध्वस्त करून टाकली. पिके खाऊन तुडवण्याचा व्हिडीओही समोर आला आहे. धरमजयगड वनविभागातील लैलुंगा वनपरिक्षेत्रात हत्तींचा कळप फिरत असून हा कळप सायंकाळी शेतकऱ्यांच्या शेताकडे निघतो. विभागीय नोंदीनुसार रविवारी सायंकाळी हत्तींनी 49 शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान केले.
सहा सायबर ठगांना कोठडी
भोपाळमध्ये अटक करण्यात आलेल्या सातपैकी सहा सायबर ठगांना पोलिसांनी तुरुंगात पाठवले आहे. टोळीचा म्होरक्या शशिकांत कुनार ऊर्फ मनीष 20 नोव्हेंबरपर्यंत कोठडीत आहे. त्याच्या मोबाईलमध्ये संशयास्पद ऍप सापडले असून त्याने तब्बल 300 अल्पवयीन मुलांच्या आधारद्वारे बनावट बँक खाती उघडली होती. ही खाती विकल्याचे मनीषने सांगितले. तो या बनावट आधार आणि पॅनकार्डच्या मदतीने बँक खाती उघडत असल्याचे समोर आले आहे.