उद्धव ठाकरे यांच्याबाबत खोट्या बातम्या पसरवणाऱ्या नितेश राणे यांच्यावर कठोर कारवाई करा, शिवसेनेचे निवडणूक आयोगाला पत्र

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबाबत खोट्या बातम्या तसेच बदनामीकारक मजकूर पसरविण्यात येत आहे. भाजपचे देवगड विधानसभेचे उमेदवार नितेश राणे यांनी त्यांच्या एक्स अकाऊंटवरून उद्धव ठाकरे यांच्याबाबत खोटी बातमी पसरवली होती. त्याबाबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून निवडणूक आयोगाला पत्र लिहून नितेश राणे व सदर मजकूर प्रसिद्ध करणाऱ्या अकाऊंट्सवर बंदी आणावी, तसेच त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे.

”निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आणून देण्यात येत आहे की, भारतीय जनता पक्षाचे देवगड विधानसभेचे उमेदवार आणि पक्ष प्रवक्ते नितेश नारायण राणे यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंट ट्विटरवर उद्धव ठाकरे यांच्या बद्दल एका खोट्या बातमीच्या आधारे बदनामीकारक मजकूर पसरवून मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. (स्क्रीनशॉट सोबत जोडत आहोत) तसेच ह्या खोट्या बातमीवर काही अश्लाघ्य मजकूर लिहून त्याच्याही पोस्ट काही सोशल मीडिया अकाऊंटवर करण्यात येत आहेत. (स्क्रीनशॉट सोबत जोडत आहोत) हा प्रकार निवडणूक आयोगाच्या आदर्श आचारसंहिता परिशिष्ट 1 भाग 7 मधील आदेश क्र. (iv) (Decorum in campaign) नुसार गुन्हा तर आहेच परंतु या खोट्या, अश्लाध्य अपप्रचारामुळे सर्व शिवसैनिकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. निवडणूक प्रचारादरम्यान धार्मिक विद्वेष वाढवून मतांचे ध्रुवीकरण करण्याचा हा प्रयत्न आहे. महाराष्ट्रातील निवडणुकात पराभवाची भीती दिसू लागल्याने, पायाखालची वाळू सरकल्याने निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात धार्मिक उद्रेक होऊन निवडणुकांचे वातावरण गढूळ करण्याचा हा गंभीर गुन्हा असल्याने आमची याबाबतीत निवडणूक आयोगाकडे मागणी आहे की, या खोट्या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन याबाबतीत संबंधित नितेश राणे व हा मजकूर प्रसिध्द करणाऱ्या इतरही समाज माध्यम खाते धारकांच्या समाज माध्यम खात्यांवर बंदी आणावी व संबंधित खातेधारकांवर भारतीय कायद्याद्वारे कठोरात कठोर कारवाई करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना द्यावेत, असे शिवसेनेने निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रात म्हटले आहे.