महाराष्ट्रातील जनता शिव, फुले, शाहू, आंबेडकरी विचारांची आहे, ती विकली जाणार नाही; जयंत पाटील यांचा विश्वास

राज्यात विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरु झाल्यापासून सत्ताधारी पक्षांकडून मोठ्या प्रमाणावर सरकारी यंत्रणा आणि पैशांचा गैरवापर सुरु आहे. आदर्श आचारसंहिता आणि नियम डावलून मतदारांना पैशांचे वाटप सुरू आहे. भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस व राज्याचे माजी मंत्री विनोद तावडे यांना मतदारांना पैसे वाटताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. भ्रष्टाचारातून कमावलेल्या पैशांचा वापर करून भाजपा आणि सत्ताधारी मते विकत घेऊन लोकशाहीला काळीमा फासण्याचे काम करत आहेत. या घटनेबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी तीव्र शब्दांत टीका केली आहे. तसेच महाराष्ट्रातील जनता विकली जाणार नाही, असा विश्वासही जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

निष्पक्ष व पारदर्शक पद्धतीने निवडणुका झाल्या पाहिजेत त्यासाठी निवडणूक आयोगाने आचारसंहिता लागू केली आहे. पण राज्यात सत्ताधारी पक्षांकडून दररोज आचारसंहितेचे उल्लंघन केल्याच्या घटना घडत आहे. वसई विरार परिसरातील विवांता हॉटेलमध्ये भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस व माजी मंत्री विनोद तावडे हे मतदारांना पैसे वाटत असताना त्यांना पकडले आहे. या घटनेबाबत जयंत पाटील यांनी एक्सवर पोस्ट केली आहे.

एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये जयंत पाटील यांनी म्हटले आहे की, भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांना वसई विरार येथे पैसे वाटताना रंगेहात पकडले गेले आहे. राज्यात जागोजागी हेच चित्र आहे. महायुतीचे प्रमुख नेते पैशांच्या बॅगा घेऊन प्रत्येक मतदारसंघात महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनतेला विकत घेण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र महाराष्ट्रातील जनता विकली जाणार नाही. ही जनता शिव, फुले, शाहू, आंबेडकरी विचारांची जनता आहे…, असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे.