खोके देऊन आमदार विकत घेतले, पैसे देऊन आता मतदार विकत घेणार का? सुप्रिया सुळे यांचा सवाल

या सरकारने नोटबंदी केली होती, मग विनोद तावडेंकडे एवढी रोख रक्कम आली कशी असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी विचारला आहे. तसेच खोके देऊन आमदार विकत घेतले, पैसे देऊन आता मतदार विकत घेणार का? असेही सुळे म्हणाल्या.

सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषद घेतली. तेव्हा सुळे म्हणाल्या की, या देशात नैतिकता राहिली आहे की नाही, जर पैसे देऊन निवडणुक लढवणार असतील तर आमच्यासारख्या लोकांनी काय करायचे. 50 खोके देऊन तुम्ही आमदार विकत घेतले आात मतदारही विकत घेणार का? या देशात लोकशाही आहे, या भिती आणि दडपशाहीचा मी जाहीर निषेध करते. या प्रकरणाची चौकशी व्हावी आणि आणि हे आरोप खरे असतील तर राजीनामे देऊन मान्य करावे की हो हे गलिच्छ राजकारण आम्ही केलंय म्हणून. निवडणूक आयोगाने सामान्य नागरिकांना न्याय दिला पाहिजे असे सुळे म्हणाल्या.

 

नोटबंदी या सरकारने केली होती. मग चलनात एवढ्या नोटा येतात कशा? विनोद तावडेंवर हे आरोप होत आहेत यावर मला विश्वासच बसत नाहिये. भाजपच्या मूळ नेत्यांकडून मला अशी अपेक्षा नव्हती. भाजप 2.0 याबद्दल मी आधीच बोलले आहे. पण मूळ भाजपचे असलेले विनोद तावडे यांच्याकडून झालेली ही कृती अतिशय अस्वस्थ आहे. काळा पैसा जावा म्हणून केंद्र सरकारने नोटबंदी केली होती. असे असेल तर ही पाच कोटी रुपयांची रोख रक्कम भाजपकडे कशी आली? भाजपने पाच कोटी रुपयांची रोख रक्कम विरारपर्यंत आणली कशी? असे सवालही सुळे यांनी उपस्थित केले.