ठाणे जिल्ह्यातील 18 मतदारसंघामध्ये 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून त्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. ही प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी ठाणे जिल्ह्यात 10 हजार 935 पोलीस, 4 हजार 161 होमगार्ड व केंद्रीय सुरक्षा बलाच्या 24 कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत. एकूण 244 उमेदवार निवडणूक रिंगणात असून 72 लाख 29 हजार 339 मतदार मतदान करणार आहेत. दरम्यान जिल्ह्यात आचारसंहिता भंगाचे 20 गुन्हे दाखल झाले असून प्रत्येक मतदान केंद्रावर सीसी कॅमेऱ्यांसह विशेष वॉच ठेवण्यात येणार आहे.
ठाणे जिल्ह्यात भिवंडी ग्रामीण, शहापूर, भिवंडी पश्चिम, भिवंडी पूर्व, कल्याण पश्चिम, मुरबाड, अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण पूर्व, डोंबिवली, कल्याण ग्रामीण, मीरा-भाईंदर, ओवळा-माजिवडा, कोपरी-पाचपाखाडी, ठाणे, मुंब्रा-कळवा, ऐरोली, बेलापूर असे १८ मतदारसंघ आहेत. ठाणे जिल्ह्यातील मतदारसंघातील मतदानाच्या तयारीची माहिती देण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषद घेण्यात आली. त्यात संपूर्ण जिल्ह्यातील तयारीचा आढावा जिल्हाधिकारी व निवडणूक निर्णय अधिकारी अशोक शिनगारे यांनी घेतला.
उल्हासनगरा 24 ड्रोनचा वॉच
उल्हासनगर – मतदानाची प्रक्रिया भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी तसेच कायदा, सुव्यवस्था आणि शांतता अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे. त्यासाठी उल्हासनगर पोलीस परिमंडळात येणाऱ्या 8 पोलीस ठाण्यांच्या हद्दीत 24 ड्रोन कॅमेऱ्यांचा वॉच असणार आहे.
एक तासात निकाल लागणार
यावर्षी मतमोजणीसाठी खास काळजी घेण्यात आली असून ईव्हीएम मशीनची मते मोजण्यासाठी जिल्ह्यात 286 टेबलांची व्यवस्था केली आहे. पोस्टल बॅलेटची मते 82 तर सैन्य दलाची मते मोजण्यासाठी 21 टेबल आहेत. त्यामुळे मतमोजणी जलद होणार असून एक तासात निकाल लागेल, असा विश्वास निवडणूक अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
एकूण 6 हजार 955 मतदान केंद्रे
ठाणे जिल्ह्यात 6 हजार 955 मतदान केंद्रे उभारण्यात आली असून एकूण 30 हजार 868 कर्मचाऱ्यांना विविध जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. या कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षणदेखील पूर्ण झाले असून प्रत्येक मतदान केंद्रावर आवश्यक त्या सुविधा पुरवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
- ठाणे जिल्ह्यात आजपर्यंत 85 हून अधिक वयोमान असलेल्या 895 ज्येष्ठ मतदारांनी घरातून मतदान केले आहे. तर 3 हजार 942 जणांनी पोस्टल बॅलेटद्वारे मतदान केले आहे.
- आजतागायत व्होटिंग स्लीपचे 87 टक्के वाटप झाले असून 100 टक्के वाटप करू शकलो नाही, अशी कबुलीही जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.
- जिल्ह्यात दारू, अमली पदार्थ व रोख रक्कम मिळून 32 कोटी 7 लाख 12 हजार 969 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
- मतदान केंद्रात मोबाईलला बंदी घातली असून प्रवेशद्वारावरच मोबाईल जमा करावे लागणार आहेत.
- राज्यात सर्वाधिक 1 हजार 675 तक्रारी ठाणे जिल्ह्यात आल्या होत्या. त्यापैकी 93 टक्के तक्रारींचे निवारण केले असल्याचा दावा पत्रकार परिषदेत करण्यात आला.