विरारमध्ये विनोद तावडे यांनी पैसे वाटल्याचा आरोप; बविआ-भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा, Video व्हायरल

भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस विनोद तावडे यांनी विरारमध्ये पैसे वाटल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीने केला आहे. यावरून विरार पूर्वच्या विवांत हॉटेलमध्ये बविआ-भाजप कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला. याचा व्हिडीओ समोर आला असून बविआच्या कार्यकर्त्यांनी विनोद तावडे यांना घेरल्याचे दिसत आहे.

विरार पूर्व भागातील मनोरीपाडा येथील विवांत हॉटेलमध्ये भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे आले होते. याठिकाणी भाजपचे स्थानिक उमेदवार राजन नाईक आणि काही पदाधिकारीही उपस्थित होते. विनोद तावडे हे या पदाधिकाऱ्यांना मतदारांना वाटण्यासाठी 5 कोटी रुपये घेऊन आले होते, असा आरोप बहुजन विकास आघाडीने केला.

विनोद तावडे ज्या विवांत हॉटेलमध्ये थांबले होते तिथे हितेंद्र ठाकूर यांचे सुपुत्र क्षितिज ठाकूर आणि बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी धाड टाकली. बविआच्या कार्यकर्त्यांनी विनोद तावडे यांना घेरले. त्यांच्याकडे काही रक्कमही सापडली. यावेळी बविआ आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

दरम्यान, विनोद तावडे यांच्या हातामध्ये पैशांची बंडले असल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. याबाबत आमदार हितेंद्र ठाकूर यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हटले की, भाजपचा राष्ट्रीय नेता पैसे वाटतो ही शरमेची बाब आहे. रंगेहाथ पकडल्यानंतर तावडे यांनी मला 25 वेळा फोन केला. मला माफ कर असे ते म्हणाले. मात्र पोलिसांनी आणि निवडणूक आयोगाने योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी हितेंद्र ठाकूर यांनी केली.