निवडणुकीपूर्वीच मिंध्यांचं मतदान सुरू; वोटिंग, आधार कार्ड ताब्यात घेऊन पैसे वाटप, दोघांना अटक

विधानसभा निवडणुकीसाठी गेल्या महिनाभरापासून धडाडत असलेल्या प्रचारातोफा सोमवारी सायंकाळी थंडावल्या. राज्यात उद्या 20 नोव्हेंबर रोजी मतदान, तर 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. मात्र लोकसभेप्रमाणे विधानसभेलाही राज्यातील जनता महाविकास आघाडीच्या पाठीशी उभी असल्याचे संकेत अनेक सर्व्हेंमधून आल्याने सत्ताधाऱ्यांची चांगलीच तंतरली आहे. त्यामुळे गोची झालेल्या मिंध्यांकडून मतदारांना पैसे वाटप करून त्यांचे वोटिंग आणि आधार कार्ड ताब्यात घेतले जात असल्याचे समोर आले आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये सोमवारी रात्री हा प्रकार उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ उडाली. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

प्रचाराच्या तोफा थंडावल्यानंतर रात्रीच्या अंधारात सत्ताधाऱ्यांकडून पैशाचा खेळ सुरू झाला. छत्रपती संभाजीनगरमध्ये पैशाचे आमिष दाखवून वोटिंग कार्ड आणि आधार कार्ड ताब्यात घेऊन मतदान करण्यास रोखणाऱ्या दोघांना जवाहरनगर पोलील आणि एफएसटी पथकाने अटक केली आहे. अशोक वाकुडे (वय – 38, रा. शंभुनगर, गारखेडा परिसर, छ. संभाजीनगर) आणि नदीम अहमद खान पठाण (वय – 45, रा. इंदिरानगर, छ. संभाजीनगर) अशी दोघांची नावे आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अशोक वाकुडे याने रिक्षाचलक नदीम अहमद खान पठाण याला पैशाचे आमिष दाखवून त्याचे व त्याच्या पत्नीचे वोटिंग कार्ड व आधार कार्ड जबरदस्तीने काढून घेतले. या बदल्यात आरोपीने त्याला 2 हजार रुपये दिले. यासह रविकिरण जिजाभाऊ चव्हाण, जालिंदर जऱ्हाड, प्रशिक भिवसेन आणि संदिप सुरडकर यांचेही वोटिंग कार्ड आणि आधार कार्ड जमा करून मतदानाच्या दिवशी मतदान केले नाही तर 2 हजार रुपये देण्याचे आश्वासन दिले.

या संदर्भातील व्हिडीओ समोर आल्यानंतर जवाहरनगर पोलिसांनी एफएसटी पथकाच्या मदतीने इंदिरानगर परिसरातून दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्यावर कलम 126(2),171,173,3 (5) भा. न्या. सं अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघांनाही आज दुपारी न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

2 कोटींची रक्कम संजय शिरसाट यांच्या फोननंतर सोडली!

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या संदर्भात एक ट्विट करत आमदार संजय शिरसाट यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. छत्रपती संभाजीनागरच्या जवाहरनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बोटाला शाई लावून, निवडणूक ओळखपत्र जमा करून घेऊन पैसे वाटप होत असल्याची बाब समोर आली आहे. या दरम्यान पोलिसांनी साधारण 18 लाखांची रक्कम जमा करून घेत अंदाजे 2 कोटींची रक्कम आमदार संजय शिरसाट यांच्या फोननंतर सोडण्यात आल्याची माझी माहिती आहे. याचा अर्थ बहुदा निवडणूक आयोगाला संभाजीनगरात निःपक्षपाती निवडणूक घ्यायची नाही. ‘कर्तव्यदक्ष’ जिल्हाधिकारी आणि सगळी निवडणूक यंत्रणा असताना शाई कोणाच्या सांगण्यावरून आणि कशी बाहेर आली, हा प्रश्न आहे. याचा तातडीने निवडणूक आयोगाने खुलासा करायला हवा आणि प्रकरणात तातडीने कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी अंबादास दानवे यांनी केली.

लोकशाही खिळखिळी करण्याचा प्रयत्न – राजू शिंदे

दरम्यान, याचा भंडाफोड झाल्यानंतर जवाहरनगर पोलीस स्थानकाबाहेर पश्चिम विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडी व शिवसेनेचे उमेदवार राजू शिंदे यांच्यासह शिवसैनिकांनी गर्दी केली. दलित, मुस्लिम मतदान आपल्या बाजूने होत नसल्याचे लक्षात येताच काही लोक वॉर्डात सोडण्यात आले आहेत. वोटिंग कार्ड, आधार कार्ड ताब्यात घेऊन त्यांना 1500 रुपये देण्यात येत आहे. मतदान होऊ नये म्हणून बोटाला शाई लावण्यात येत आहे. लोकशाही खिळखिळी करण्याचा हा प्रयत्न आहे. मतदान होऊ न देणे हा राज्यघटनेने दिलेल्या अधिकारांवर गदा आणण्याचा प्रकार असल्याची टीका राजू शिंदे यांनी केली.