जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय…! शरद पवारांच्या सभांनी राज्यभरात मैदान गाजवलं

विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते शरद पवार यांनी महाराष्ट्र पिंजून काढला. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी बारामतीमधील सभेवेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका कार्यकर्त्याने आणलेला फलक प्रतिभा पवारांनी आपल्या हाती घेऊन उंचावला. या फलकावर ‘जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय,’ असं लिहिण्यात आले होते. हे पोर्स्टर पाहून उपस्थित जनसमुदायाने एकच जल्लोष केला.

विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी शरद पवार यांनी बारामती मतदारसंघातून निवडणुकीस उभ्या असलेल्या नातू युगेंद्र पवार याच्यासाठी सभा घेतली. त्याआधी कर्जत-जामखेड येथे रोहित पवारांसाठी प्रचार सभा घेतली. मतदान करण्याचा अधिकार तुमच्या हातात आहे. त्यासाठी सर्वांनी मतदान पेंद्रावर जायचं आणि ‘तुतारी वाजवणारा माणूस’ बटण दाबायचं व मोठय़ा मतांनी राष्ट्रवादी कॉँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या उमेदवारांना विजयी करायचं, असे आवाहन शरद पवार यांनी केले.

पाच दिवसांपूर्वी आंबेगाव मतदारसंघात झालेल्या प्रचार सभेच्या वेळी शरद पवार यांनी दिलीप वळसे पाटील यांची चांगलीच खरडपट्टी काढली. आता यांनी बोलायला काय ठेवलं आहे का? त्यांनी एकच गोष्ट ठेवली, फक्त गद्दारी. गद्दारी करणाऱ्यांना सुट्टी नाही. त्यांचा मोठय़ा फरकाने पराभव करा, असे आवाहन केले. वाई येथे शनिवारी शरद पवार यांची सभा सुरू असताना एक चिठ्ठी आली, गद्दारांचे करायचे काय? ती चिठ्ठी सभेत दाखवत गद्दारांना पाडा, पाडा आणि पाडा, असे आदेशच शरद पवार यांनी देताच उपस्थितांनी एकच जल्लोष करत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. अजित पवार गटाचे उमेदवार ज्या ज्या ठिकाणी लढत आहेत, त्या ठिकाणी जोरदार सभा घेत शरद पवार यांनी सत्ताधाऱयांना घाम पह्डला आहे.

85 व्या वर्षी राज्याच्या कानाकोपऱ्यात प्रचार

विधानसभेच्या प्रचारासाठी 85 वर्षीय शरद पवार हे या राज्याच्या कानाकोपऱयात फिरत आहेत. कधी शेतकऱयांच्या बांधावर, तर कधी गावच्या पारावर दिसतात. ते कधी प्रचार सभेत, तर कधी प्रचार फेरीत सहभागी होत आहेत. लहान-मोठय़ा वाडय़ा-वस्त्यांवर जाऊन सामान्य जनतेशी संपर्क साधत आहेत. त्यांचा हा कामाचा व्याप पाहून त्यांच्या विरोधकांनाही धडकी भरली आहे.

लोकसभेच्या वेळी होती ‘सुजल्यावर कळतं…ची चर्चा

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या नेतृत्वातील पक्षाने दहा जागा लढवत आठ जागा जिंकल्या होत्या. या वेळी ‘सुजल्यावर कळतं, शरद पवारांनी मारलंय कुठं, असा उपरोधिक टोला लगावणारे बॅनर कोल्हापुरातील स्टँड परिसरामध्ये लावण्यात आले होते याची चर्चा सर्वत्र झाली होती.

तब्बल 69 सभा

विधानसभेच्या प्रचारासाठी शरद पवार यांनी राज्यात तब्बल 69 सभा घेतल्या. प्रचाराच्या पहिल्या टप्प्यात शरद पवार यांनी विदर्भ, खान्देश आणि नंतर मराठवाडय़ावर लक्ष पेंद्रित केले. यानंतर पवारांनी आपला मोर्चा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असणाऱया पश्चिम महाराष्ट्राकडे वळवळा. कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर आणि पुणे जिह्यात झालेल्या शरद पवार यांच्या सभांना मिळालेला प्रतिसाद चर्चेचा विषय ठरत आहे.