>> देवेंद्र भगत
मुंबईतील अत्यंत महत्त्वाचा मतदारसंघ असलेल्या बोरिवली विधानसभा मतदारसंघात मतदारांनी भाजपला वारंवार संधी देऊनही वाहतूक, पाणी, रस्ते आणि मूलभूत सुविधांची वानवा आहे. त्यामुळे आता मतदार परिवर्तनाच्या मानसिकतेत असून महाविकास आघाडीचे उमेदवार शिवसेनेचे संजय भोसले यांना प्रचारादरम्यान प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. यातच या ठिकाणचे भाजपचे दिग्गज नेते, माजी खासदार गोपाळ शेट्टी यांना भाजपने लोकसभा आणि आता विधानसभा निवडणुकीसाठी तिकीट नाकारल्याने त्यांची नाराजीही आघाडीच्या पथ्यावर पडणार आहे. त्यामुळे बोरिवलीत या वेळी परिवर्तन होणार असल्याचे चित्र आहे.
शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवार संजय भोसले गेल्या अनेक वर्षांपासून समाजकारण करीत आहेत. कोरोना काळात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली कोविडग्रस्तांसह नागरिकांना सर्व प्रकारची मदत भोसले यांच्या पुढाकाराने मिळाली. यामुळे अनेकांचे जीव वाचवण्यासही मोठी मदत झाली. आगामी काळात मतदारांनी साथ दिल्यास शिवसेनेच्या माध्यमातून अत्याधुनिक मंडईची निर्मिती, गोराई गावात सरकारी प्रसूतीगृह व सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, फेरीवाला झोन, महाविद्यालय उभारणे, मत्स्यालय, रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण, गोराई गावात स्मशानभूमी, पाणी, मैदाने, गणेश-दुर्गा विसर्जन, छटपूजा तसेच गोराई घाटाची निर्मिती, वाहतूक व्यवस्था, अशी कामे प्राधान्याने सोडवण्यात येणार असल्याचे वचननाम्यात संजय भोसले यांनी म्हटले आहे.
भाजपच्या बाहेरच्या उमेदवारामुळे नाराजी
बोरिवलीत गुजराती, मारवाडी आणि जैन मतदारांची संख्या लक्षणीय आहे. तर मराठी आणि उत्तर भारतीय-मुस्लिमही बहुसंख्येने आहेत. या ठिकाणी भाजपला वारंवार संधी मिळाली असली तरी नेहमी बाहेरचा उमेदवार लादला जात असल्यामुळेच मतदार नाराज आहेत. या नाराजीतूनही माजी खासदार गोपाळ शेट्टी यांनी बंडखोरी करीत अपक्ष म्हणून उमेदवारी अर्जही भरला होता. मात्र अखेरच्या क्षणी त्यांनी अर्ज मागे घेतला. त्यांची नाराजी कायम असल्याचे बोलले जाते. या वेळी भाजपने संजय उपाध्याय या बाहेरच्या उमेदवाराला संधी दिली आहे. कृणाल माईणकर या नवख्या ‘मनसे’ उमेदवाराचे अस्तित्वही जाणवत नसल्याने संजय भोसले यांचा विजय निश्चित मानला जात आहे.