पर्थवर संकटांची मालिका कायम! राहुलचे भाग्य फळफळणार; जुरेललाही न्याय मिळण्याची शक्यता

आधी खेळाडूंच्या दुखापती आणि मग रोहित शर्माची माघार… त्यामुळे पर्थवर हिंदुस्थानी संघाची संकटांची मालिका संपता संपेना. शुबमन गिलचा ऐनवेळी अंगठा मोडल्यामुळे हिंदुस्थानची सलामीची जोडीही विस्कळीत झाली आणि अपयशी केएल राहुलसाठी संघाचे द्वार आपोआप उघडले. तरीही मधल्या फळीत सरफराजला वगळून ध्रुव जुरेलला न्याय देण्याचे संकेत दिले जात आहेत, तर चौथा गोलंदाज म्हणून हर्षित राणाला पर्थवर पदार्पणाची संधी मिळण्याची शक्यता आहे.

हर्षित राणा पदार्पण करणार

पर्थच्या वेगवान खेळपट्टीवर हिंदुस्थान चार वेगवान गोलंदाजांसह उतरणार हे कुणाला वेगळे सांगण्याची गरज नाही. त्यामुळे रवींद्र जाडेजा आणि रविचंद्रन अश्विनपैकी एकाचीच निवड केली जाणार हे स्पष्ट आहे. पण न्यूझीलंडविरुद्ध भन्नाट फिरकी मारा करणाऱया वॉशिंग्टन सुंदरलाही विसरून चालणार नाही. त्यामुळे जाडेजाच्या जागी त्यालाही अंतिम संघात घेतले जाऊ शकते. पण संघात चौथा वेगवान गोलंदाज म्हणून प्रसिध कृष्णा आणि हर्षित राणा यांच्यात टॉस उडवला जाऊ शकतो आणि यात राणाला पर्थवर पदार्पणाची बहुमूल्य संधीही देण्याच्या तयारीत संघव्यवस्थापन दिसत आहे. म्हणजेच पर्थवर हिंदुस्थानी संघात एक पदार्पणवीर नक्कीच असेल.

रोहित पहिल्या कसोटीदरम्यान येणार

रोहित शर्मा पहिल्या कसोटीसाठी हिंदुस्थानी संघात नसणार हे जवळजवळ स्पष्ट आहे. तरीही तो पर्थ कसोटी दरम्यानच ऑस्ट्रेलियात दाखल होणार असल्याचे सूत्रांकडून कळले आहे. एवढेच नव्हे तर, त्याच्यासोबत मोहम्मद शमीसुद्धा ऑस्ट्रेलिया गाठणार आहे. तोसुद्धा दोन दिवसीय सराव सामन्यात खेळू शकतो. येत्या 30 नोव्हेंबरला दोन दिवसीय सराव सामना खेळविला जाणार आहे आणि 6 डिसेंबरपासून अॅडलेड येथे दुसरी कसोटी सुरू होईल.

हिंदुस्थानचा संभाव्य अंतिम संघ

यशस्वी जैसवाल, केएल राहुल, विराट कोहली, ध्रुव जुरेल, सरफराज खान/देवदत्त पडिक्कल, ऋषभ पंत (यष्टिरक्षक), रवींद्र जाडेजा, जसप्रीत बुमरा (कर्णधार), मोहम्मद सिराज, आकाश दीप, प्रसिध कृष्णा/ हर्षित राणा.

राहुल सलामीला उतरण्यासाठी सज्ज

रोहित शर्माच्या अनुपस्थितीत शुबमन गिलला सलामीला उतरवण्याची रणनीती हिंदुस्थानी संघ व्यवस्थापन करत होता आणि अचानक सरावादरम्यान गिलच्या अंगठय़ाला दुखापत झाली. दुखापत इतकी गंभीर आहे की, गिलला पर्थ कसोटीला मुकावे लागले आणि हिंदुस्थानच्या सलामीची अवस्था आणखी बिकट झाली. आधीच शर्मा नाही, त्यात गिलही बाहेर गेला. परिणामतः ऑस्ट्रेलियात अपयशी ठरलेल्या केएल राहुलसाठी कसोटीचे द्वार उघडले आणि तो थेट यशस्वी जैसवालसोबत सलामीला उतरणार आहे. या स्थितीमुळे संघात आणखीही काही बदल अपेक्षित आहेत आणि हे बदल बुधवारी जाहीर होण्याची शक्यता आहे.

ध्रुव जुरेलला मिळणार संधी

जुरेलला ऑस्ट्रेलियन अ संघाविरुद्ध अनौपचारिक कसोटी खेळण्यासाठी पाठवण्यात आले होते. हा सामना खऱया अर्थाने राहुलसाठी होता. तो खेळावा आणि रोहितच्या अनुपस्थितीत त्याची संघात वर्णी लागावी, अशी वरिष्ठांची इच्छा होती. मात्र झाले उलटे. राहुल दोन्ही डावांत अपयशी ठरला. पण अपयशी ठरूनही संघावर कोसळलेल्या संकटामुळे त्याला संघातही स्थान मिळणार आहे आणि तो सलामीलाही खेळणार आहे. पण या संकटकालीन स्थितीत खऱया अर्थाने संकटमोचक असलेल्या ध्रुव जुरेलचा व्यवस्थापनाला विसर पडला होता. पण अपयशी ठरलेल्या सरफराजच्या जागी त्याला खेळवण्याची शक्यता वाढली आहे. दुसरीकडे ऑस्ट्रेलियन दौऱयावर असलेल्या देवदत्त पडिक्कलकडेही पाहिले जात आहे. ऐनवेळी त्यालाही संघात घेतले तर आश्चर्य वाटणार नाही. तसेही अभिमन्यू ईश्वरनसुद्धा संघात आहे. पण सध्या पडिक्कलचे नाव पहिले घेतले जात आहे.