मणिपूरमध्ये शनिवारी रात्री हिंसाचार भडकल्यापासून परिस्थिती अजूनही तणावाखाली आहे. रविवारी रात्री जिरीबाम जिह्यात आंदोलकांकडून आमदारांच्या घरांवर हल्ले, जाळपोळ सुरू असताना सुरक्षा दलांनी केलेल्या गोळीबारात एका मैतेई आंदोलकाचा मृत्यू झाला. त्यानंतर परिस्थिती आणखीनच बिघडल्याचे चित्र आहे. राज्यभरात शाळांना दोन दिवसांची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान, आज सुरक्षा दलांच्या बैठका झाल्या. या वेळी सुरक्षा व्यवस्था आणखी मजबूत करण्याच्या दृष्टीने चर्चा करण्यात आली.
के अथौबा (20) असे मृत्युमुखी पडलेल्या आंदोलकाचे नाव आहे. एका प्रत्यक्षदर्शीने दावा केला आहे की, सुरक्षा दलाच्या दिशेने आलेल्या गोळीने अथौबाचा वेध घेतला. आंदोलकांनी रविवारी काँग्रेस आणि भाजपची कार्यालयेही पेटवून दिली. कार्यालयातील फर्निचर, कागदपत्रे आणि इतर साहित्य कार्यालयाच्या बाहेर आणून ते पेटवून दिल्याचे सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. केंद्र सरकारने मणिपूरमधील परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी सीएपीएफ अर्थात केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या 50 तुकडय़ा म्हणजेच पाच हजार जवान मणिपूरमध्ये तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे.
n सात जिह्यांमध्ये अनिश्चित काळासाठी संचारबंदी लागू करण्यात आली असून सात जिह्यांमध्ये इंटरनेट सेवा बंद आहे.
n मणिपूर विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्री बिरेन सिंह आणि राज्यपाल एल.पी. आचार्य यांचे पुतळे जाळले. आर्मी, आसाम रायफल्स, सीमा सुरक्षा दल, केंद्रीय राखीव पोलीस दल, मणिपूर पोलीस आणि राज्यातील कमांडो इंफाळ तसेच विविध ठिकाणी गस्त घालताना दिसत आहेत.
शहा यांनी राजीनामा द्यावा, मोदींनी मणिपूरला भेट द्यावी – काँग्रेस
मणिपूरमधील परिस्थिती चिघळल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसद अधिवेशनापूर्वी मणिपूरला भेट द्यावी. तसेच मणिपूरमधील डबल इंजिन सरकार राज्यात कायदा आणि सुव्यवस्था कायम राखण्यात सपशेल अपयशी ठरल्याची जबाबदारी स्वीकारून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी काँग्रेसने केली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी आज नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन काही मुद्दे मांडले. संसदेचे अधिवेशन 25 नोव्हेंबरला सुरू होत आहे. त्यापूर्वी पंतप्रधानांनी मणिपूरमधील सर्वपक्षीय शिष्टमंडळाची भेट घ्यावी अशी मागणी जयराम रमेश यांनी केली. 3 मे 2023 रोजी मणिपूर जळत असताना मोदींनी विविध देशांना भेटी दिल्या, परंतु मणिपूरसाठी जराही वेळ काढला नाही. त्यामुळे मोदींनी मणिपूरमध्ये जाऊन तेथील पक्ष, राजकीय नेते, सामाजिक संघटना आणि मदत शिबिरांतील लोकांच्या भेटी घ्याव्यात, त्यांच्या भावना समजून घ्याव्यात अशी आमची पहिली मागणी असे जयराम रमेश म्हणाले.