शिवसेनेची निशाणी कोणती? मशाल… बाळासाहेबांची मशाल… शिवसेनाप्रमुखांची मशाल… हिंदुहृदयसम्राटांची मशाल. मी बाळासाहेबांची मशाल आहे, महाराष्ट्रातील बेबंदशाही मी माझ्या मताने जाळून भस्म करणार म्हणजे करणारच अशा त्वेषाने आणि जिद्दीने प्रत्येकाने मतदानासाठी उतरले पाहिजे.
‘‘विधानसभा निवडणुकीच्या लढाईत केवळ माझ्या अस्तित्वाचा प्रश्न नाही, तर महाराष्ट्राच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. महाराष्ट्राला लुटायचे काम सुरू आहे. गुलाम बनवण्याचे काम सुरू आहे. ते आपल्या डोळय़ांदेखत होऊ द्यायचे… अजिबात नाही. उतरा… सर्वांनी सहकुटुंब मतदानासाठी उतरा आणि शिवसेनेच्या मशालीने महाराष्ट्रातील बेबंदशाही भस्म करून टाका,’’ असे खणखणीत आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज महाराष्ट्रप्रेमी जनतेला केले.
विधानसभा निवडणूक प्रचाराच्या आजच्या शेवटच्या दिवशी उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधला. आज मी महाराष्ट्रातील जनतेकडे न्याय मागायला आलोय. व्यक्तिगत माझ्यासाठी नाही, तर आपल्या सर्वांसाठी, लोकशाहीसाठी न्याय मागायला आलोय, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘‘गेल्या अडीच वर्षांपूर्वी जनतेच्या आशीर्वादाने महाविकास आघाडीचे सरकार चालले होते. ते कोणत्या पद्धतीने पाडण्यात आले आणि कोणत्या पद्धतीने नवीन सरकार जनतेच्या माथ्यावरती जनतेच्या इच्छेविरुद्ध बसवण्यात आले ते आपण सर्वजण भोगत आहोत. अडीच वर्षे झाली शिवसेना न्याय मागतेय, पण न्याय मिळत नाही. न्यायाला विलंब होणे म्हणजेच न्याय नाकारणे असे म्हणतात. हा एक प्रकारे न्याय नाकारला जातोय. शेवटी न्यायालयाकडून न्याय मिळत नसेल, तर जसे लोकमान्य टिळक म्हणाले होते त्याप्रमाणे सर्वोच्च न्यायालयात म्हणजेच जनतेच्या दरबारात मी न्याय मागण्यासाठी आलो आहे.’’
‘‘मिंधे आणि भारतीय जनता पक्ष किती बेगुमानपणे वागतोय. दिवसाढवळय़ा दरोडा घालून शिवसेना पक्ष चोरला. शिवसेनेचे नाव चोरले. पक्षाचे चिन्ह चोरले. अगदी शिवसेनाप्रमुखांचा पह्टोसुद्धा चोरणि म्हला आणे हे त्यांचे विचार घेऊन पुढे चालले आहेत,’’ असा घणाघातही उद्धव ठाकरे यांनी केला.
लोकशाही टिकवण्यासाठी जनतेचे आशीर्वाद हवेत
शिवसेनेचे सर्वकाही चोरले तरी केवळ आणि केवळ जनतेच्या आशीर्वादामुळे मी ठाम उभा आहे, असे सांगताना उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘‘मिंधे आणि भाजपने माझे सर्वकाही चोरले तरी ते जनतेचे प्रेम, आशीर्वाद आणि विश्वास चोरू शकत नाहीत. त्या बळावरच शिवसेना या बेबंदशाहीविरुद्ध लोकशाहीची लढाई लढत असून त्यासाठी जनतेचे आशीर्वाद हवे आहेत,’’ अशा भावना उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केल्या. ही लढाई मला काही हवंय म्हणून नाही, तर देशातील लोकशाही टिकवण्यासाठी मला जनतेची सोबत हवी आहे, असे ते म्हणाले.
शिवसेना, महाविकास आघाडीला भरघोस मते द्या!
आपल्या कुटुंबात जेवढे मतदार आहेत त्या सर्वांनी उतरा आणि जिथे जिथे शिवसेनेचे, महाविकास आघाडीचे उमेदवार उभे आहेत त्यांना भरघोस मते द्या, अशी साद उद्धव ठाकरे यांनी जनतेला घातली.