छत्रपती संभाजीनगरात बोटांना शाई लावून पैसे वाटप, मतदान टाळण्यासाठी ‘मिंध्यांची’ हेराफेरी; अंबादास दानवेंनी केला भंडाफोड

छत्रपती संभाजीनागरच्या जवाहर नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मिंध्यांकडून मतदान टाळण्यासाठी मतदारांना पैसे वाटप करून त्यांच्या बोटाला शाई लावण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या ठिकाणी ज्या मतदारांच्या बोटाला शाई लावली जात आहे त्यांची ओळख पत्रं देखील जप्त करण्यात येत आहे. या ठिकाणी पोलिसांनी धाड टाकून 18 लाख रुपयांची रक्कम जप्त केली. मात्र घटनास्थळी दोन कोटींची रक्कम होती व ती मिंध्यांचे आमदार संजय शिरसाट यांच्या फोननंतर परत केल्याची शक्यता विधानपरिषदेतील विरोधी पक्ष नेते व शिवेसना नेते अंबादास दानवे यांनी व्यक्त केली आहे. तसेच मतदान केंद्रांवरील शाई बाहेर कशी आली याचा खुलासा निवडणूक आयोगाने व मुख्य निवडणूक आयुक्तांनी करावा , अशी मागणी देखील दानवे यांनी केली आहे.

अंबादास दानवे यांनी याबाबत ट्विट करत या घटनेचा भंडाफोड केला आहे. ”छत्रपती संभाजीनागरच्या जवाहर नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बोटाला शाई लावून, निवडणूक ओळखपत्र जमा करून घेऊन पैसे वाटप होत असल्याची बाब समोर आली आहे. या दरम्यान पोलिसांनी साधारण 18 लाखांची रक्कम जमा करून घेत अंदाजे 2 कोटींची रक्कम आमदार संजय शिरसाट यांच्या फोननंतर सोडण्यात आल्याची माझी माहिती आहे. याचा अर्थ बहुदा निवडणूक आयोगाला संभाजीनगरात निःपक्षपाती निवडणूक घ्यायची नाही. ‘कर्तव्यदक्ष’ जिल्हाधिकारी आणि सगळी निवडणूक यंत्रणा असताना शाई कोणाच्या सांगण्यावरून आणि कशी बाहेर आली, हा प्रश्न आहे. याचा तातडीने निवडणूक आयोग व मुख्य निवडणूक आयुक्तांनी खुलासा करायला हवा आणि प्रकरणात तातडीने कायदेशीर कारवाई करावी”, असे ट्विट दानवे यांनी केले आहे.