अनिल देशमुखांवर समाजकंटकांचा भ्याड हल्ला, चौकशी करून मास्टरमाईंडला गजाआड करा; सुप्रिया सुळेंचा संताप

विधानसभा निवडणुकीच्या तोफा थंडावल्या असून प्रचाराची सांगता झाली. बुधवारी (20 नोव्हेंबर 2024) संपूर्ण राज्यात एकचा टप्प्यात मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. अवघ्या काही तासांवर मतदान प्रक्रिया येऊन ठेपली आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवर अज्ञातांकडून तुफान दगडफेक करण्यात आली. या दुर्घटनेत त्यांना गंभीर दुखावत झाली आहे. त्यामुळे राज्याच राजकारण पुन्हा एकदा तापलं आहे. भाजपाच्या काळात राज्यातील विशेषतः नागपूर जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेची दुर्दशा झाली असून गुंडांना मोकळे रान मिळाले आहे, अशी जळजळीत टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

सुप्रिया सुळे यांनी एक्सवर ट्वीट करत महायुती सरकारवर सडकून टीका केली असून अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध केला आहे. त्या म्हणाल्या की, प्रचार संपवून परत जात असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते अनिलजी देशमुख साहेब यांच्यावर काही समाजकंटकांनी भ्याड हल्ला केला. ‌ही अतिशय दुर्दैवी आणि संतापजनक घटना आहे. आम्ही सर्वजण या हल्ल्याचा निषेध करतो. निवडणुकीच्या काळात अशा पद्धतीने हल्ला करणारी मानसिकता या राज्यात कधीही नव्हती. हे राज्य लोकशाही विचारांना मानणारे राज्य आहे. पण भाजपाच्या काळात राज्यातील विशेषतः नागपूर जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेची दुर्दशा झाली असून गुंडांना मोकळे रान मिळाले आहे. या घटनेची सखोल चौकशी होऊन देशमुख साहेबांवर हल्ला करणारे हल्लेखोर आणि त्यांचे मास्टरमाईंड गजाआड झाले पाहिजेत ही आमची मागणी आहे, असे म्हणत सुप्रिया सुळे यांनी या घटनेचा निषेध केला. तसेच हल्लेखोरांवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे.