सामना अग्रलेख – महाराष्ट्र धर्माची लढाई

मोदीशहांनी महाराष्ट्र उघडपणे लुटला. अदानी या उद्योगपती मित्राच्या घशात मराठी माणसाची मुंबई घातली हे सर्व उघडय़ा डोळय़ांनी पाहत मोदींचा जय करणारे फडणवीसमिंधे यांना महाराष्ट्र धर्माचे शत्रूच म्हणावे लागेल. महाराष्ट्रात बेरोजगारांच्या फौजा उभ्या राहत आहेत. शेतकरी आत्महत्या सुरूच आहेत. महाराष्ट्राची औद्योगिक आणि आर्थिक घसरण सुरू आहे. गुंडगिरी, लुटमार, कोयता गँगचा हैदोस, महिलांवरील अत्याचाराने कळस गाठला आहे. शिवरायांचा पुतळा भ्रष्टाचाराने उन्मळून पडतो त्याच भ्रष्टाचाराच्या पैशांनी निवडणुका लढवल्या जातात. महाराष्ट्र राज्याची पत आणि प्रतिष्ठा धुळीस मिळवणारे सरकार मोदीशहा चालवत आहेत. महाराष्ट्राला हे सर्व उलथवून टाकावे लागेल. आज प्रचार संपला, उद्या मतदान होईल. ही महाराष्ट्र धर्माची लढाई आहे. मराठी माणसा जागा रहा. सावध रहा!

विधानसभा निवडणुकांचा प्रचार संपला आहे. गेल्या पंधरा दिवसांतील राजकीय धुळवड त्यामुळे थांबली. महाविकास आघाडी विरुद्ध भाजपप्रणीत महायुती असाच एकंदरीत सामना आहे. बाकी मधल्यामध्ये भाजपपुरस्कृत सुपाऱ्या आणि चणे-फुटाणे उडत आहेत. सगळाच पैशांचा खेळ. त्यामुळे आपल्या लोकशाहीचा साफ खेळखंडोबा झाल्याचे दिसत आहे. पंतप्रधान मोदी, गृहमंत्री शहा, उत्तर प्रदेशसह भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री आपापली राज्ये वाऱ्यावर सोडून महाराष्ट्रात पिचकाऱ्या उडवीत फिरत होते. उत्तर प्रदेशातील झाशी येथील सरकारी इस्पितळात आग लागून 12 नवजात अर्भकांचा जळून कोळसा झाला, पण त्या राज्याचे मुख्यमंत्री मुंबईत ‘बटेंगे तो कटेंगे’चे नारे देत फिरत होते. हा इतका निर्घृण कारभार फक्त महाराष्ट्रावर ताबा मिळविण्यासाठी चालला आहे. मणिपुरात हिंसाचार पुन्हा भडकला. चार महिलांची नग्न धिंड काढून त्यांच्यावर बलात्कार करून ठार केले. मणिपुरातील मंत्र्यांचे बंगले लोकांनी जाळले आणि पंतप्रधान, गृहमंत्री महाराष्ट्र व झारखंडच्या प्रचारात शिवसेना, राष्ट्रवादी काँगेसवर टीका करीत राहिले. ‘एक है तो सेफ है’ हा त्यांचा नवा नारा म्हणजे स्वतःचा डरपोकपणा सिद्ध करणारा आहे. मणिपुरात जाऊन तेथील हिंसाचार थांबविण्याची धमक आणि कुवत देशाच्या पंतप्रधान, गृहमंत्र्यांत नाही व महाराष्ट्रात येऊन ते हिरोगिरी करतात. महाराष्ट्र सुरक्षित आहेच हो, तुमच्या येण्याने अस्थिर आणि असुरक्षित होत आहे. मोदी म्हणाले, ‘‘राहुल गांधी यांनी शिवसेनाप्रमुख

बाळासाहेब ठाकरे यांच्या विषयी

दोन चांगले शब्द बोलून दाखवावेत.’’ दुसऱ्याच दिवशी प्रियंका गांधी यांनी कोल्हापूरच्या सभेत मोदी यांना खोटे ठरवले. ‘‘बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेता, त्यांचे फोटो लावून मते मागता आणि त्यांच्या चिरंजीवांच्या पाठीत खंजीर खुपसता! हे कसले बाळासाहेबांचे प्रेम?’’ प्रियंका गांधी यांनी मोदींचा ठाकरे प्रेमाचा मुखवटाच ओरबाडून टाकला. शिवसेनाप्रमुखांच्या पुण्यतिथीला स्वतः राहुल गांधी यांनी बाळासाहेबांना श्रद्धांजली वाहून आदर व्यक्त केला. निवडणूक प्रचारात मोदी-शहांचा खोटेपणा रोज उघडा पडला. गुजरातचे मंबाजी व तुंबाजी यांनी महाराष्ट्रात येऊन जो हैदोस घातला. त्याचा अंत करण्यासाठी ही विधानसभा निवडणूक आहे. बेइमान-गद्दारांचे सरकार महाराष्ट्रात आहे. तीन वर्षांपूर्वी शिवसेना फोडून मिंधे सरकार आणले. हे सरकार बेकायदेशीर असल्याचे मान्य करूनही सर्वोच्च न्यायालयाने अडीच वर्षे चालू दिले. ज्यांनी न्याय करायचा ते सरन्यायाधीश चंद्रचूड ‘तारीख पे तारीख’चा खेळ करीत राहिले व शेवटी निवृत्त झाले. विधानसभेची मुदतही संपली, पण न्याय काही झाला नाही. त्यामुळे गद्दारांचा न्याय आता जनतेच्याच न्यायालयात होईल. भाजप व त्यांच्या मिंध्यांकडील प्रचाराचे मुद्दे संपले. पैशांचे वारेमाप वाटप हीच त्यांची ताकद आहे. गेल्या दहा वर्षांपासून जातीधर्मात तेढ, तणाव निर्माण करून निवडणुका लढवल्या जात आहेत. ‘सब का साथ, सब का विकास’ हा मोदींचा नारा होता. त्याची जागा ‘व्होट जिहाद’, ‘बटेंगे तो कटेंगे’ने घेतली.

विकासाच्या नावाने ‘ठणठण गोपाला’

झाल्यानेच भाजपला हे ‘बटेंगे’, ‘व्होट जिहाद’सारखे विषय घेऊन मतांसाठी बांग मारावी लागत आहे. या देशात सर्वच जातीधर्मांच्या नागरिकांना मत देण्याचा अधिकार आहे. हीच आपल्या संविधानाची ताकद आहे, पण भाजपला संविधानाची ताकद कमजोर करून स्वतःची हुकूमशाही प्रस्थापित करायची आहे. मुसलमानांनी जेव्हा भाजपला मतदान केले, तेव्हा तो ‘व्होट जिहाद’ नव्हता, पण मोदींच्या वर्तणुकीस वैतागून लोकशाही व संविधान रक्षणासाठी मुसलमान, ख्रिश्चन, पारशी, जैन एकवटले तेव्हा तो ‘व्होट जिहाद’ ठरवला गेला. लोकशाही मार्गाने मत देणाऱ्यांना लक्ष्य करून धर्मयुद्धाची भाषा करणारे देवेंद्र फडणवीस यांनी खरे तर महाराष्ट्र धर्माशीच द्रोह केला. मोदी-शहांनी महाराष्ट्र उघडपणे लुटला. अदानी या उद्योगपती मित्राच्या घशात मराठी माणसाची मुंबई घातली व हे सर्व उघडय़ा डोळय़ांनी पाहत मोदींचा जय करणारे फडणवीस-मिंधे यांना महाराष्ट्र धर्माचे शत्रूच म्हणावे लागेल. महाराष्ट्रात बेरोजगारांच्या फौजा उभ्या राहत आहेत. शेतकरी आत्महत्या सुरूच आहेत. महाराष्ट्राची औद्योगिक आणि आर्थिक घसरण सुरू आहे. गुंडगिरी, लुटमार, कोयता गँगचा हैदोस, महिलांवरील अत्याचाराने कळस गाठला आहे. शिवरायांचा पुतळा भ्रष्टाचाराने उन्मळून पडतो व त्याच भ्रष्टाचाराच्या पैशांनी निवडणुका लढवल्या जातात. महाराष्ट्र राज्याची पत आणि प्रतिष्ठा धुळीस मिळवणारे सरकार मोदी-शहा चालवत आहेत. महाराष्ट्राला हे सर्व उलथवून टाकावे लागेल. आज प्रचार संपला, उद्या मतदान होईल. ही महाराष्ट्र धर्माची लढाई आहे. मराठी माणसा जागा रहा. सावध रहा!