तुमचे नेते महिलांवरील अत्याचार थांबवतील, तेव्हाच आम्ही सेफ राहू; विनेश फोगाट यांचा भाजपवर हल्लाबोल

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत भाजपकडून देण्यात आलेल्या बटेंगे तो कटेंगे आणि एक है तो सेफ है या नाऱ्यांना विरोधकांकडून जबरदस्त प्रत्युत्तर देण्यात आले आहे. आता यावर आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू तसेच काँग्रेस पक्षाच्या आमदार विनेश फोगाट यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ‘भाजपकडून एक है तो सेफ है हा नारा दिला जात आहे. पण आम्ही तेव्हा सेफ राहू जेव्हा यांच्या नेत्यांकडून महिलांवर होणारे अत्याचार हे थांबविले जाईल’ अशा शब्दांत त्यांनी भाजपवर निशाणा साधला.

विनेश फोगाट यांची पुण्यातील काँग्रेस भवनामध्ये पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्यांनी भाजपवर तोफ डागली. त्यांनी महिलांसाठी योजना आणली आहे पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयाच्या 100 मीटरच्या बाहेर जेव्हा महिला आंदोलन करत असतात तेव्हा महिलांच्या प्रती त्यांचा असलेला आदर का दिसत नाही?’, असा सवाल त्यांनी केला. निवडणुका जवळ येतात तेव्हाच त्यांचं महिलांच्या प्रती आदर आणि प्रेम हे दिसून येतो. इतर वेळी त्यांनी लाडक्या बहिणींची आठवण का होत नाही, असा सवालही त्यांनी केला.

देशात भाजपच्या विरोधात जो कोणी बोलेल त्याला देशद्रोही ठरवण्यात येत आहे. आम्ही त्यांच्या नेत्यांच्या विरोधात आवाज उठवला होता. त्यामुळे मलाही देशद्रोही ठरवलं गेलं. महाराष्ट्राच्या आदर्श संस्कृतीत द्वेष पसरवण्याचे काम भाजपने केलं आहे. आता जनता 20 तारखेला मतदानातून त्यांना धडा शिकवेल, असेही त्यांनी ठणकावले. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यास आम्ही नक्कीच इथली संस्कृती जपू’, असे आश्वासनही त्यांनी दिले.

त्यांनी निवडणुकीच्या तीन महिने आधी लाडकी बहीण योजना आणली. दिल्लीत भर रस्त्यांवर अन्यायाच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या महिला खेळाडू तुमच्या लाडक्या नव्हत्या का, याचे उत्तर भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी द्यावे, असा सवाल विनेश फोगाट यांनी केला. कोणत्याही महिलेवर अन्याय होऊ नये, यासाठीच आपण राजकारणात प्रवेश केला आहे, असेही त्या म्हणाल्या. दिल्लीत आम्ही महिला खेळाडूंवर झालेल्या अन्यायाविरोधात आंदोलन करत होतो. भाजप सरकारने आमच्याकडे साधे लक्षही दिले नाही. केंद्र व राज्य स्तरावरूनही लाडकी बहीणसारख्या योजना आणल्या जात आहेत. मात्र, त्या निवडणुकीच्या आधी तीन महिने आणल्या. यावरून त्यांचा हेतू दिसतो. आम्ही लाडक्या बहिणी नव्हतो का, असा प्रश्नही फोगाट यांनी केला.