महाराष्ट्र लुटणाऱ्याला ठोकलं पाहिजे, असे विधान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. तसेच कोणत्याही परिस्थितीत गद्दारांना गाडायचं असा निर्धारही उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला.
कर्जतमध्ये उद्धव ठाकरे यांनी सभा घेतली. तेव्हा उद्धव ठाकरे म्हणाले की, मी भाजपला विचारतोय, मिंध्यांना सोडून द्या ते गद्दारच आहेत. आज भाजपने ज्या जाहिरात केली आहे त्यांना विचारायचे आहे की जेव्हा संपूर्ण महाराष्ट्र कोरोनासोबत लढत होता त्यावेळी भाजपच्या महाराष्ट्र युनिटने महाराष्ट्राला पैसे दिले नव्हते तर पीएम केअर फंडात पैसे दिले होते. हे भाजपचं महाराष्ट्रावर प्रेम. महाराष्ट्रात औषधं मिळत नव्हती, ऑक्सिजन मिळत नव्हता. आपण संपूर्ण ताकदीनीशी लढत होतो. तेव्हा हे भाजपवाले पीएम केअरला पैसे देत होते असे उद्धव ठाकरे म्हणाले.
भाजपचे आमदार जयकुमार गोरेंवर आरोप आहेत. मृत व्यक्तींवर रुग्ण म्हणून उपचार केल्याचे दाखवले आणि पैसे हडप करणारे भाजपचे उमेदवार. मी मुद्दामहून इथे आलोय कारण कोणत्याही परिस्थितीत गद्दारांना गाडायचं आहे. वर्षा बंगला जेव्हा मी सोडला तेव्हा मला कोरोना झाला होता. डॉक्टरांनी मला लोकांमध्ये जायला नाही सांगितलं होतं, पण लोकांमध्ये नाही जाणार तर कुठे जाणार. अनेकांनी मला सांगितलं की त्यावेळी आम्ही रडत होतो, कुणी जेवलं नाही कोणी झोपलं नाही. हे सर्व प्रेम मी एका बाजुला अनुभवत होतो तेव्हा हा गद्दार हातात दारुचा ग्लास घेऊन टेबलवर नाचत होता. पण गद्दारी सेलिब्रेट करणारा आपला आमदार होऊ शकतो का?
मी अडीच वर्ष मुख्यमंत्री होतो, तेव्हा इथला हा गद्दार आमदार एकही काम घेऊन आला नाही माझ्याकडे. अडीच वर्षानंतर याने गद्दारी केली खोके घेऊन तिकडे गेला. जनतेला धोके आणि स्वतःला खोके. गेल्या अडीच वर्षात कर्जत विधानसभेत किती विकासकामे केली याचा काही हिशोब आहे? राज्यात जिथे जिथे गद्दारी झाली तिथे अनेक कंत्राटं दिली गेली. सरकारच्या तिजोरीतून पैसा दिला गेला आहे पण तो खालपर्यंत गेलाच नाही. मग हा पैसा कोणी खाल्ला.
50 खोके यांच्यासाठी सुटे पैसे झाले आहेत. महाराष्ट्रातले हजारो कोटी रुपयांनी यांनी लुटले आहेत. निवडणूक जवळ आल्यानंतर काही पैसेवाले आले होते. आपल्याकडे उमेदवारी मागत होते. माझ्याकडे कोण किती पैसे ओततो याला किंमत नाही. निष्ठेने हाती भगवा कोण घेऊन उभा राहतो याला महत्त्व आहे. नितीन यांच्याकडे एवढे पैसे नसतील, तिकडे पैशांचा महापूर आहे पण या पैशांच्या महापुरात निष्ठेचा खडक वाहून देणार आहात का? महापूर येतो आणि जातो. पैसे देऊन मत विकत घेणारे हे महाराष्ट्राला काय सुख देणार?
आज आलेलं हे संकट फक्त एका पक्षावर नाही तर महाराष्ट्रावर आलेलं आहे. इथला एक एक आमदारा तिथे महाराष्ट्राद्रोह्यांना रोखण्यासाठी उभा राहणार आहे. शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी ठरवायचं आहे की त्यांनी महाराष्ट्रद्रोह्यांना मदत करायची की महाराष्ट्रप्रेमींना? अपक्षांनाही मी सांगतो की कुणाची सुपारी घेऊन येऊ नका, सुपारी कातरायला हे मतदार खंबीर आहेत. गद्दार जरी विकला गेला तरी माझा कर्जतकर विकला गेलेला नाही. कारण जर तो विकला गेला असता तर या भर उन्हात माझी वाट बघत बसला नसता.
इथे विमानतळाचे काम सुरू आहे. इथल्या जमीनींना भाव येतील. मुंबईतली जागा जशी घशात घातली गेली तशी अदानीच्या घशात घालतील. अदानीचं नाव तुमच्या सात बारावर टाकलं तर कुणाकडे दाद मागणार? तेव्हा हे गद्दार त्यांचे बुट चाटत बसले तर तुम्हाल न्याय कोण देणार?
या जिल्ह्यात काँग्रेसला एकही जागा देऊ शकलो नाही,त्यांचे मी आभार मानतो तरी तुम्ही सोबत राहिलात. हा समंजसपणा काँग्रेसने दाखवला आहे तसा आपण पूर्व विदर्भात दाखवला आहे. आता तुझं माझं करण्याची वेळ नाही. हे आपला आहे आणि आपलं कोणी लुटत असेल तर आपण एक होऊन लुटणाऱ्याला ठोकलं पाहिजे आणि आपला महाराष्ट्र वाचवला पाहिजे म्हणून महाविकास आघाडीची निर्मिती झाली असेही उद्धव ठाकरे म्हणाले.