मावळात शेळके-भेगडेंमध्ये तगडा सामना; ‘मावळ पॅटर्न’ची मोठी चर्चा

मावळ मतदारसंघात महायुतीमधील नाराजांनी एकत्र येत राबविलेल्या ‘मावळ पॅटर्न’मुळे राज्यभरात या मतदारसंघाची जोरदार चर्चा सुरू आहे. याठिकाणी सर्वपक्षीय पुरस्कृत अपक्ष उमेदवार बापू भेगडे आणि महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे विद्यमान आमदार सुनील शेळके यांच्यात सामना होत आहे. मावळात आरोप-प्रत्यारोपांसह विविध गंभीर आरोप दोन्ही बाजूंकडून होत आहेत.

मावळ हा 1967 मध्ये स्वतंत्र विधानसभा मतदारसंघ झाला. 1990 पर्यंत या मतदारसंघावर काँग्रेसचे वर्चस्व होते. त्यामुळे पूर्वी हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात असे. मात्र, 1995 मध्ये काँग्रेसच्या रूपलेखा ढोरे यांना भाजपने ऐनवेळी उमेदवारी देऊन निवडून आणले. त्यानंतर सलग 25 वर्षे भाजपचे उमेदवार या मतदारसंघात विजयी झाले. त्यामुळे मावळ भाजपचा गड मानला जात होता. मात्र, 2019 मध्ये भाजपमध्ये बंडखोरी झाली. उमेदवारी नाकारल्याने सुनील शेळके यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि भाजपचे माजी आमदार बाळा भेगडे यांचा 90 हजारपेक्षा अधिक मतांनी पराभव केला. 2019 पासून आमदार शेळके आणि मावळ भाजपमध्ये टोकाचा, व्यक्तिगत राजकीय संघर्ष सुरू आहे.

भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष, माजी आमदार बाळा भेगडे, किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष गणेश भेगडे यांनी पदाचे राजीनामे देऊन अपक्ष उमेदवार बापू भेगडे यांना जाहीर पाठिंबा दिला आणि ‘मावळ पॅटर्न’ उदयास आला. भेगडे यांना महाविकास आघाडी, मनसेने आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षातीलही काही जणांनी पाठिंबा दिला आहे. त्यामुळे मावळात शेळके विरुद्ध सगळे असे वातावरण झाले आहे. अशा विविध बाबींमुळे प्रचारात गंभीर आणि व्यक्तिगत आरोपांच्या फैरी झडत आहेत.

पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा – पुन्हा एकदा बागवे-कांबळे लढत!

आमदार शेळकेंच्या पराभवासाठी भाजपचे प्रयत्न

भाजप, शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट अशा तीन पक्षांची महायुती आहे. महायुतीकडून आमदार सुनील शेळके उमेदवार आहेत. असे असताना मावळ भाजपने अपक्ष उमेदवार बापू भेगडे यांना निवडून आणण्याचा आणि शेळके यांचा पराभव करण्याचा चंग बांधला आहे. शेळके पाच वर्षांत केलेल्या कामाच्या मुद्यावर निवडणूक लढवत आहेत, तर मागील पाच वर्षांत मावळात दादागिरी, दडपशाही वाढल्याच्या मुद्यावर भेगडे यांनी मतदारसंघात रान पेटविले आहे.