मिंध्यांच्या कार्यकर्त्याने बनवली बनावट ईव्हीएम मशीन; अपप्रचार करणाऱ्या बगलबच्च्याविरोधात गुन्हा

बनावट ईव्हीएम मशीन बनवून अपप्रचार करणाऱ्या मिंध्यांच्या कार्यकर्त्याविरोधात आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अयुब टिवाळे असे या बगलबच्च्याचे नाव असून त्याने मतदारांना ही बनावट ईव्हीएम मशीन दाखवून 1 नंबरचे बटन सुरू असून बाकीची बटने खराब झालेली आहेत. त्यामुळे एक नंबरचेच बटन दाबा अशी मतदारांची दिशाभूल केली. या अपप्रचाराला व्हिडीओ व्हायरल होताच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आमदार अनिल परब यांनी निवडणूक आयोगाकडे केलेल्या तक्रारीनुसार ही कारवाई करण्यात आली.

कर्जत विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार नितीन सावंत व मिंध्यांचे उमेदवार महेंद्र थोरवे यांच्यात लढत होत आहे. मात्र प्रचाराच्या रणधुमाळीत मिंध्यांच्या बगलबच्च्यांनी कर्जतमध्ये अपप्रचार करत निवडणूक आचारसंहितेचा भंग केला आहे. कर्जतच्या सखोळ T येथील मिंधेंचा कार्यकर्ता आयुब याने बनावट ईव्हीएम मशीनवर महेंद्र थोरवे यांच्या नावासमोरील बटन सुरू असून बाकीची बटने खराब असल्याने फक्त एक नंबर दाबा, अशा भूलथापा देत मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी शिवसेना नेते अनिल परब यांच्या तक्रारीनंतर गटविकास अधिकारी सुशांत पाटील यांनी नेरळ पोलीस ठाण्यात आयुबविरोधात – मतदारांमध्ये गैरसमज पसरवल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक नितीन मंडलिक पुढील तपास करत आहेत.

संजय केळकरांनी ठाणेकरांची घुसमट केली; शिवसेनेचे राजन विचारे यांची भाजपवर जोरदार टीका