मतदान काही तासांवर तरी व्होटर स्लिप घरोघरी पोहोचल्याच नाहीत, ठाणे जिल्ह्यात मतदार 72 लाख; कर्मचारी 30 हजार

मतदानाची वेळ अवघ्या काही तासांवर आली असताना ठाणे जिल्ह्यात व्होटर स्लिपच पोहोचल्या नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीसाठी मतदारांची संख्या वाढल्याने व्होटर्स स्लीप (मत चिठ्ठी) वाटताना प्रशासनाची चांगलीच दमछाक होत आहे. ठाणे जिल्ह्यात एकूण मतदार 72 लाख 29 हजार 339 आणि कर्मचारी मात्र 30 हजार 868 इतकेच आहेत. त्यामुळे एवढ्या मोठ्या संख्येने असलेल्या मतदारांपर्यंत 20 नोव्हेंबरपूर्वी पोहोचताना कर्मचाऱ्यांना चांगलीच कसरत करावी लागत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 72 टक्के व्होटस स्लिपचे वाटप करण्यात आले आहे. उर्वरित स्लीप वाटणार तरी केव्हा, असा प्रश्न विचारला जात आहे.

ठाणे जिल्ह्यातील 18 विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज झाले आहेत. जिल्ह्यात एकूण 72 लाख 29 हजार 339 मतदारांच्या हाती 244 उमेदवारांचे भवितव्य आहे. विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात एकूण 38 लाख 45 हजार 42 पुरुष तर 33 लाख 82 हजार 882 महिला मतदार आहेत. 1603 सैनिक मतदार तर 1415 तृतीयपंथी मतदार आहेत.

पत्ते सापडत नसल्याने गठ्ठे पडून

आजवरच्या निवडणुकीत जेमतेम 48 ते 53 टक्के मतदान झाले आहे. मात्र यावेळी जिल्ह्यात 75 टक्के मतदान होण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. त्याअनुषंगाने जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघात व्होटर्स स्लिप वाटण्याची लगबग सुरू आहे. अनेक ठिकाणी कर्मचाऱ्यांना मतदार स्थलांतरित झाल्याने किंवा त्यांचे पत्ते सापडत नसल्याने व्होटर्स स्लिपचे गले पडून आहेत.