पेण विधानसभा मतदारसंघातून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार प्रसाद भोईर हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. मात्र असे असताना शेकाप उमेदवार अतुल म्हात्रे हे आपणच महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार असल्याचे सांगत मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करत आहेत. याबाबत शिवसेनेने निवडणूक आयोगाकडे तक्रार करत म्हात्रे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
पेणमध्ये शिवसेना-महाविकास आघाडीकडून प्रसाद भोईर, भाजप महायुती – रवींद्र पाटील तर शेकापचे अतुल म्हात्रे अशी तिहेरी लढत होणार आहे. या मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार प्रसाद भोईर यांना मतदारांचा जोरदार पाठिंबा मिळत असल्याने विरोधकांचे धाबे दणाणले आहेत. त्यामुळे अतुल म्हात्रे आपणच महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार असल्याचा खोटा प्रचार करत आहेत. यासाठी ते शिवसेनेसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोटो प्रचारादरम्यान वापरत आहेत. हा आचारसंहितेचा भंगच असल्याचा आरोप करत शिवसेनेचे उपसचिव सचिन परसनाईक यांनी मुख्य निवडणूक अधिकारी यांच्याकडे तक्रार केली असून कारवाईची मागणी केली आहे.