आगामी दिल्ली विधानसभा निवडणूक ही महाभारताप्रमाणे धर्मयुद्ध आहे, असे आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे. आज चांदनी चौक येथे आयोजित जिल्हास्तरीय पक्ष कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. दरम्यान, दिल्ली विधानसभा निवडणूक पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये होणार आहे.
दिल्लीतील सर्वच्या सर्व 70 जागांवर लढणार असून उमेदवारी देताना नातेवाईक किंवा मित्र यांना तिकीट देणार नाही याची गॅरंटी देतो, असेही केजरीवाल म्हणाले. उमेदवारी देताना बघणार की जनता त्याच्याबद्दल काय म्हणते… या सर्व गोष्टी पडताळून घेऊन मगच पक्ष जो निर्णय घेईल त्या निर्णयासोबत आपल्या सर्वांना उभे रहायचे आहे, असेही ते म्हणाले. दिल्ली विधानसभा निवडणुकीची तुलना महाभारतातील धर्मयुद्धाशी करताना ते म्हणाले, त्यांच्याकडे कौरवांप्रमाणे प्रचंड पैसा आणि ताकद आहे. मात्र आपल्यासोबत पांडवांप्रमाणे देव आणि जनता आहे. आपण दिल्लीच्या जनतेला मोफत वीज, पाणी, शिक्षण, आरोग्य, तीर्थ यात्रा आणि महिलांसाठी बस प्रवास देत आहोत. भाजपाला कुठल्याही स्थितीत दिल्लीची सत्ता हवी आहे, असे अरविंद केजरीवाल म्हणाले.