महाराष्ट्राच्या अधोगतीला कारणीभूत ठरलेल्या महायुतीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी रविवारी जोरदार हल्लाबोल केला. सत्तेत असलेल्या त्रिकुटामुळे महाराष्ट्राची अधोगती झाली आहे. त्यामुळे सत्तेतील त्रिकुट घरी गेल्याशिवाय महाराष्ट्राची प्रगती होणार नाही, अशा शब्दांत सुप्रिया सुळे यांनी महायुतीच्या मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला.
इंदापूर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार हर्षवर्धन पाटील यांच्या प्रचारसभेत सुप्रिया सुळे बोलत होत्या. महाराष्ट्र महागाईने होरपळत आहे. राज्यातील उद्योग बाहेर जात आहेत. मात्र सत्तेत असलेल्या त्रिकुटाने याबाबत तोंडातून एकही शब्द काढला नाही. हे त्रिकूट अमित शाह यांना प्रचंड घाबरते. या त्रिकुटामुळे राज्याची अधोगती झाली आहे. दरडोई उत्पन्नात महाराष्ट्र देशात दुसऱ्या-तिसऱ्या स्थानी होता. तो आज अकराव्या स्थानावर गेला आहे, असे सांगत सुप्रिया सुळे यांनी सत्तेतील त्रिकूट घरी गेल्याशिवाय महाराष्ट्राची प्रगती होणार नसल्याचा हल्लाबोल या वेळी केला.
महाराष्ट्राने ‘गद्दार’ शब्दाला कधीच माफ केले नाही
सभेत बोलताना सुप्रिया सुळे यांनी गद्दारांचा समाचार घेतला. महाराष्ट्राने ‘गद्दार’ शब्दाला कधीच माफ केले नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी गद्दारांचे हात कापण्याचेदेखील आदेश दिले होते. मराठी माणसाला फसवलेले, गद्दारी केलेले आवडत नाही. ज्यांनी पवार साहेबांना फसवण्याचे, गद्दारी करण्याचे काम केले, त्यांना महाराष्ट्रात सगळीकडे मोठय़ा प्रमाणात शिक्षा होणार आहे, असे सुळे म्हणाल्या.
‘महाविकास’चेच सरकार येणार
आम्ही रायगडावर जाऊन शिवरायांच्या पायाशी तुतारी अर्पण करून प्रचाराला सुरुवात केली आहे. आम्हाला महाराष्ट्रात जनतेने प्रचंड प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे राज्यात महाविकास आघाडीचेच सरकार येणार, याची मी खात्री देते, असा विश्वासही सुळे यांनी व्यक्त केला.