कार अपघातानंतर ऋषभ पंतला पाहिले तेव्हा तो पुन्हा कधी क्रिकेट खेळेल, अशी मला आशाही नव्हती. पण तो बरा झाला आणि त्याचे खेळणे हे निव्वळ चमत्कारच असल्याची भावना हिंदुस्थानचे माजी कर्णधार आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी व्यक्त केलीय.
बॉगाक कसोटी मालिकेसाठी सध्या हिंदुस्थानी संघात खेळत असलेल्या ऋषभ पंतची ऑस्ट्रेलियातील धावांची सरासरी 62 धावांची आहे. तो सध्या सुपर फॉर्मात आहे आणि त्याचीच सर्वाधिक भीती ऑस्ट्रेलियाला असेल. दोन वर्षांपूर्वी तो जखमी झाला होता आणि मी महिनाभराने त्याला रुग्णालयात पाहायला गेलो होतो तेव्हा तो या मालिकेत खेळण्याची शक्यता खूपच कमी होती. एवढेच नव्हे तर तो क्रिकेटमध्ये पुनरागमन करेल, याचीही मला शाश्वती नव्हती. मी तो दिवस कधीच विसरणार नाही. ते खूप त्रासदायक होते. त्याला खूप जखमा झाल्या होत्या. पूर्ण शरीरावर जखमांच्या खुणा दिसत होत्या. त्याचे खूप मोठे ऑपरेशनही झाले होते. शरीरावर टाकेसुद्धा दिसत होते. या स्थितीतही तो पूर्णपणे बरा झाला आणि तो फिट होऊन क्रिकेट खेळतोय, हा एक चमत्कारच आहे. तो या अपघातातून बरा झाला. पुढे क्रिकेट खेळला. खेळात प्रगती केली आणि वर्ल्ड कपमध्ये खेळला. एवढेच नव्हे तर संघाला वर्ल्ड कपही जिंकून दिला. त्याचे कसोटी संघात स्थान मिळवणेही एक मोठी गोष्ट असल्याचे शास्त्राr यांनी आवर्जून सांगितले.
बॉगाक मालिकेनिमित्त रवी शास्त्री भरभरून बोलले. ऋषभ पंत हा या मालिकेतील हिंदुस्थानचा सर्वात महत्त्वाचा खेळाडू असल्याचे ते न विसरता म्हणाले. जेव्हा तुम्ही पंतशी बोलता, तेव्हा तुमच्या मनात खेळाप्रती आदर आणखी वाढतो. क्रिकेटमध्ये परतल्यानंतर त्याने या खेळाला अधिक महत्त्व दिले आहे. हिंदुस्थानी कसोटी संघात स्थान मिळवण्यासाठी त्याने जी मेहनत घेतलीय, ती मी जवळून पाहिलीय. तो खरोखरच एक जिगरबाज खेळाडू असल्याचेही शास्त्री म्हणाले.